अहमदाबाद : पदार्पणाच्या कसोटीत पहिल्या डावात शतकी खेळी करणारे पहिले भारतीय फलंदाज दीपक शोधन यांचे आज, सोमवारी निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. सध्याच्या काळात सर्वांत प्रौढ भारतीय क्रिकेटपटू दीपक फुफ्फुसाच्या कर्करोगाने पीडित होते. त्यांचे हृदय विकाराच्या धक्याने निधन झाल्याचे बीसीसीआयने आपल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी अंतिम संस्कार करण्यात आले. आपल्या उमेदीच्या काळात डावखुरे शैलीदार फलंदाज व डावखुरे फिरकीपटू असलेल्या दीपक यांनी पदार्पणाच्या कसोटी पहिल्या डावात शतकी खेळी केली होती. दीपक यांनी १९५२ मध्ये २५ व्या वर्षी कोलकाताच्या ईडन गार्डनमध्ये पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीची सुरुवात केली. दीपक यांनी या लढतीत आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना शानदार ११० धावांची खेळी केली होती. भारताची ६ बाद १७९ अशी नाजुक अवस्था असताना दीपक यांनी डाव सावरताना संघाला ३९७ धावांची सन्मानजनक मजल मारून दिली होती. ही लढत अनिर्णीत संपली होती. पहिल्या कसोटीत शतकी खेळी करणाऱ्या शोधन यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द केवळ तीन कसोटी सामन्यांपर्यंत मर्यादित राहिली. त्यांनी ४३ प्रथम श्रेणी सामन्यांत ३१.६१ च्या सरासरीने १८०२ धावा केल्या आणि ७३ बळी घेतले. त्यात चार शतकी खेळींचा समावेश आहे. (वृत्तसंस्था)
दीपक शोधन यांचे निधन
By admin | Published: May 17, 2016 5:05 AM