- नरेंद्र जावरे परतवाडा (जि. अमरावती) : २५ मार्च २०२१ रोजी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या गुगामल वन्यजीव विभागातील हरिसाल वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. या घटनेला शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे. वर्षभरात प्रकरण पोलीस ते न्यायालय, समित्या अशा चक्रातून गेले. मात्र मेळघाटात कार्यरत इतर ‘दीपालीं’च्या समस्या ‘जैसे थे’च आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून दीपाली चव्हाण यांनी त्यांच्या शासकीय निवासात स्वत:वर गोळी झाडून जीवनाचा शेवट केला. देशभर गाजलेल्या या प्रकरणात आजही न्यायालय आणि मंत्रालयात बयान, तारीख सुरू आहे. सुसाइड नोटमध्ये लिहिल्यानुसार, तत्कालीन उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार, प्रधान मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अटक झाली. नागपूर खंडपीठाने त्यांच्यावर पोलिसांनी केलेली कारवाई व गुन्हे रद्दबातल ठरविले. त्यामुळे रेड्डींना दिलासा मिळाला. इतर दीपालींचे काय?व्याघ्र प्रकल्प आणि वनविभागात कार्यरत इतर दीपालींच्या समस्या कायम आहेत. वेतन कपातीची धमकी, सुट्या न देणे, जबरदस्तीने अतिसंरक्षित जंगलातील कॅम्पवर पाठविणे, परतवाड्यात निवासस्थानासाठी पंधरा हजारांपर्यंत लाच, आठ महिने होऊनही वेतन न देणे, कनिष्ठ न्यायालयात न्याय मिळाल्याने वरिष्ठांकडून उच्च न्यायालयात खेचण्याच्या धमक्या देणे, यामुळे वरिष्ठांच्या लेखी तक्रारी करायला आजही महिला कर्मचारी घाबरत आहेत. दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्येनंतर जागतिक महिला दिनी व्याघ्र प्रकल्पाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना समस्यांचे निवेदन दिले. मेळघाटात कुठलाही स्वागतार्ह बदल झाला नाही. याची दखल न घेतल्यास वरिष्ठ स्तरावर न्याय मागू. - इंद्रजित बारस्कर, प्रदेश महासचिव, महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना