औसा : माझ्या मुलीचा मृत्यू नसून तो खून करण्यात आला आहे, अशी तक्रार मयत दीपाली हांडे यांचे वडिल पांडुरंग बिराजदार यांनी शनिवारी गृहराज्यमंत्री प्रा़ राम शिंदे यांच्याकडे केली आहे़ आपणास किल्लारी पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाल्याचेही त्यांनी निवेदनात म्हटले आहे़तालुक्यातील मंगरुळ येथील पांडुरंग विश्वनाथ बिराजदार यांची मुलगी दीपाली हिचा विवाह चिंचोली जोगन येथील श्याम हांडे याच्याशी दोन वर्षांपूर्वी झाला होता़ तो पुणे येथील एका खाजगी कंपनीत इंजिनियर म्हणून काम करीत होता. ते दोघे पुणे येथे राहत होते. दीपालीला सात महिन्यांपूर्वी मुलगी झाली. लग्न झाल्यानंतर सहा महिन्यांनी दीपालीचा पती प्लॉट व गाडी घेण्यासाठी माहेरहुन पैसे आण, अशी मागणी करत होता. मुलगी झाल्यानंतर हा त्रास वाढतच गेला. तुझ्या वडिलांनी डोहाळ जेवण केले नाही, असे म्हणून त्रास देण्यात येत असल्याचे दीपाली हिने अनेकदा आई- वडिलांना सांगितले होते.तीन दिवसांपूर्वी शाम हांडे यांच्या आजीचे निधन झाले़ पण तो एकटाच गावाकडे आला़ आम्ही त्याच्याकडे चौकशी केली असता तो उडवा-उडवीची उत्तरे देऊ लागला़ त्यामुळे त्यानेच माझ्या मुलीचा खून करुन सात महिन्यांच्या मुलीस आईच्या प्रेताजवळ सोडून आला़ त्याची चौकशी करावी व त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात यावा़ तसेच शुक्रवारी सकाळी आम्ही किल्लारी पोलीस ठाण्यात गेलो असता, मला व माझ्या लहान भावास पोलिसांनी अपमानास्पद वागणूक दिली़ त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यावरही कारवाई करावी, अशी मागणी बिराजदार यांनी गृहराज्यमंत्री प्रा़ राम शिंदे यांच्याकडे केली आहे़ दरम्यान, मयत दीपाली हिच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले़
दीपाली हांडेचा मृत्यू नव्हे खून !
By admin | Published: June 07, 2016 12:02 AM