ऑनलाइन लोकमतशिरपूरजैन (जि.वाशिम), दि. 11 : छोट्याश्या टपरीच्या माध्यमातून चहाविक्रीचा व्यवसाय करणाऱ्या संतोष ज्ञानबा भांदुर्गे यांनी कुटूंबाचा गाडा यशस्वीपणे हाकला. आयुष्यभर काटकसर करून मुलीच्या लग्नासाठी पै-पै जमवली. त्यांच्या त्याच दिपालीचे येत्या २३ मार्चला लग्न ठरले. ती त्या आनंदाच्या क्षणांमध्ये रमली असतानाच शनिवार, ११ मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास घराला आग लागली अन् त्यात लग्नासाठी जमविलेल्या धान्यासह इतर साहित्य जळून खाक झाले.येथील कोंडबातात्या ढवळे विद्यालयानजिक भांदुर्गे कुटूुंब वास्तव्याला आहे. संतोष भांदुर्गे हे गावातच चहा विक्रीचा व्यवसाय करतात. दरम्यान, त्यांची मुलगी दिपाली हिचे लग्न मांगूळझनक (ता. रिसोड) येथील कैलास रामकिसन काळे यांचा मुलगा ज्ञानेश्वर याच्याशी जुळले आहे. येत्या २३ तारखेला शिरपूर येथे हा विवाह आयोजित करण्यात आला. केवळ १२ दिवसावर लग्न येऊन ठेपल्यामुळे संतोष भांदुर्गे यांनी लग्नाकरिता लागणाऱ्या आवश्यक साहित्यांची जुळवाजुळव करण्यासोबतच धान्य आणि कपडे खरेदी करून घरात ठेवले होते. दरम्यान, शनिवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास अचानक घराला आग लागून सर्व साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. सुदैवाने यावेळी घरात कुणीही नव्हते. संपूर्ण कुटूंब बाहेरगावी कामानिमित्त गेले होते. त्यामुळे या घटनेत कुठलीही प्राणहानी झाली नाही.
आगीच्या ज्वालांमध्ये उडाला दिपालीच्या स्वप्नांचा धूर!
By admin | Published: March 11, 2017 7:26 PM