पुणे : कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देत पुण्याच्या गणेशोत्सवाची नवीन ओळख बनलेल्या 'लोकमत आपले बाप्पा' उपक्रमात विद्यार्थ्यांनी साकारलेल्या भव्य गणरायाच्या प्रतिमेचे कौतुक करण्यासाठी प्रसिद्ध अभिनेते रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोन अवतरले. गणेशमय झालेल्या वातावरणात रणवीर सिंहने प्रचंड उत्साहात ढोल वाजवायला सुरुवात केली आणि संपूर्ण शिवछत्रपती क्रीडासंकुल 'लोकमत आपले बाप्पा'च्या जयघोषात निनादून गेले. सिद्धिविनायक ग्रुप प्रस्तुत आणि संजय घोडावत ग्रुप सहप्रायोजक असलेल्या 'लोकमत आपले बाप्पा' उपक्रमांतर्गत पुण्यातील विविध शाळांतील हजारो विद्यार्थ्यांनी गणेशाचा भव्य कोलाज साकारला. रणवीर आणि दीपिका या उपक्रमात सहभागी होणार होते. मात्र, खराब हवामानामुळे त्यांना लोणावळ्यातूनच हेलिकॉप्टरने परत फिरावे लागले. मात्र, हजारो विद्यार्थी आणि गणेशभक्तांचा उत्साह पाहून 'लोकमत'ने खास विमानाची व्यवस्था केली. म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात रणवीर-दीपिकाचे आगमन होताच एकच उत्साहाचे वातावरण संचारले. 'लोकमत आपले बाप्पा'चा जयघोष होऊ लागला. पिंपरी-चिंचवड ढोलताशा महासंघाचे शेकडो वादक देहभान हरपून ढोलवादन करू लागले. रणवीर सिंहनेही उत्साहात सहभागी होऊन ढोलवादन केले. दीपिकाही त्याला प्रोत्साहन देऊ लागली. गायक सुखविंदर सिंग यांच्या गाण्यांनी उत्साह वाढविलेला होता. प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी गाण्यांची मुखड्यांनी रंगत आणली. या वेळी सिद्धिविनायक ग्रुपचे अध्यक्ष राजेश साकला, कॉसमॉस बॅँकेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, संजय घोडावत ग्रुपचे अध्यक्ष संजय घोडावत, यूएसके फाउंडेशनच्या अध्यक्षा उषा संजय काकडे, न्यू पुना बेकरीचे कुणाल भूषण गिरमकर यांच्यासह विविध मान्यवर या वेळी उपस्थित होते. श्री शिवछत्रपती क्रीडासंकुल, पुणे महानगर परिवहन महामंडळ लि., हॉटेल कोर्टयार्ड मॅरिएट, न्यू पूना बेकरी आणि कोलते-पाटील डेव्हलपर्स यांनी या उपक्रमाला सहकार्य केले. (प्रतिनिधी)
'लोकमत आपले बाप्पा' उपक्रमात अवतरले दीपिका-रणवीर
By admin | Published: September 16, 2015 12:16 PM