ऑनलाइन लोकमतजळगाव, दि. 3 - दीपस्तंभ फाऊंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा दरवर्षी 12 जानेवारी युवक दिनानिमित्त करण्यात आली होती. राज्यातील महत्वाच्या पुरस्कारांपैकी एक अत्यंत महत्वाचा पुरस्कार म्हणून दीपस्तंभ पुरस्कार ओळखला जातो. या वर्षीचा दीपस्तंभ जीवनगौरव पुरस्कार हा महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव अरुण बोंगीरवार यांना जाहीर झाला आहे. आपल्या प्रशासकीय अधिकारी म्हणून कारकिर्दीत सामान्य जनांसाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. विविध पदांवर काम करत असताना श्री. बोंगीरवार यांनी अनेक लोकहितैशी उपक्रम राबविले आहेत. त्यांनी घेतलेले अनेक निर्णय सर्वसामान्य जनतेला सुखावह ठरणारे आहेत. या पुरस्काराचे वितरण 5 फेब्रुवारी 2017रोजी सकाळी 10 वाजता जळगाव येथील कांताई सभागृहातहोणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन, पद्मविभूषण डॉ. के. एच. संचेती, कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील, अतिरिक्त आयुक्त संदीपकुमार साळुंखे उपस्थित राहणार असून त्यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.अंध व्यक्तींसाठी विशेष कार्य केल्याबद्दल या वर्षीचा दीपस्तंभ विवेकानंद पुरस्कार स्वागत थोरात यांना जाहीर झाला आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना सर्वोतोपरी मदत मिळवून देणाऱ्या तरुणांना व संस्थांना या वर्षीचे दीपस्तंभ युवा प्रेरणा पुरस्कार घोषित झाले आहेत. यावर्षी हा पुरस्कार मैत्र मांदियाळी संस्था (जालना), ग्रामीण क्षेत्रात काम करणाऱ्या मारवाड विकास मंच (मारवाड, ता. अमळनेर) या संस्थांना तसेच सुवर्णा बागल (गटविकास अधिकारी,कराड), नवीन व स्नेहल काळे (मुंबई) व अभिजित जोंधळे (अंबेजोगाई) यांना घोषित करण्यात आले आहेत.
दीपस्तंभ फाऊंडेशनचे 2017 वर्षाचे पुरस्कार जाहीर
By admin | Published: February 03, 2017 8:31 PM