"दिल्लीसमोर अजितदादा झुकले असे चित्र..."; विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 08:10 PM2024-06-19T20:10:01+5:302024-06-19T20:48:03+5:30

अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम सुरु आहे, असे खासदार सुनील तटकरे यांनी म्हटलं.

Defamation campaign by opponents because Ajit pawar nationalists are more feared says Sunil Tatkare | "दिल्लीसमोर अजितदादा झुकले असे चित्र..."; विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

"दिल्लीसमोर अजितदादा झुकले असे चित्र..."; विरोधकांच्या टीकेला राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर

Ajit pawar : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातील निकालाचे विश्लेषण करताना आरएसएसच्या मुखपत्रातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती असे म्हणत भाजपला फटकारलं होतं. बहुमत असताना अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती? तसेच अजित पवारांमुळे भाजपची किंमत कमी झाली अशा शब्दात भाजपवर ताशेरे ओढले. राज्यातील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पाडली. या बैठकीत अजित पवार यांना बाजूला करण्याची रणनीती आखल्याचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटलं आहे. रोहित पवारांच्या दाव्याला आता राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपच्या दिल्लीतील बैठकीनंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांबाबत मोठा दावा केला आहे. देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीत अजित पवारांना बाजूला काढण्याची रणनीती आखल्याचे रोहित पवार यांनी म्हटलं आहे. "मविआच्या विरोधात दुहेरी लढतीत जनता आपल्याला पराभूत करते म्हणून तिरंगी लढत झाली पाहिजे, तिरंगी लढत झाल्यास सर्वसामान्य जनतेची मते विभागली जाऊन भाजपला फायदा होतो, असा भाजपच्या चाणक्यांचा कयास आहे. त्यामुळेच तिरंगी लढतीसाठी तिसरा पर्याय उपलब्ध करण्यासाठी अजितदादांना बळीचा बकरा करण्यात येत असून आधी आरएसएसच्या मुखपत्रातून टीका, नंतर झोपलेले तथाकथित गांधी जागा करायचे आणि आता पुढे काहीतरी करून अजितदादांना वेगळे होण्यास भाग पाडायचे ही रणनीती चाणक्यांनी दिल्लीत मांडली असल्याची चर्चा आहे," असं रोहित पवार यांनी म्हटलं.  

आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याला आता राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.  अजितदादांच्या राष्ट्रवादीची जास्त भीती वाटत असल्यानेच विरोधकांकडून बदनामीची मोहीम सुरु आहे.  परंतु या सगळयांना चारीमुंड्या चीत करुन राष्ट्रवादी काँग्रेस उभारी घेईल, असं सुनिल तटकरे यांनी म्हटलं आहे. 

"अजित पवार यांनी जे केले ते चूक हा जो अपप्रचार आणि खलनायक ठरवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे त्याला प्रत्युत्तर देण्याची गरज आहे. याचे भांडवल विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत करण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा फायदा विरोधकांना झाला नाही. लोकसभा निवडणुकीत विरोधकांनी सहानुभूती आणली त्यात ते काहीप्रमाणात यशस्वीही झाले परंतु ती सहानुभूती आता टिकणार नाही आता अजितपर्व नावाने सहानुभूती निर्माण करायची आहे," असे सुनील तटकरे म्हणाले.

"दिल्लीसमोर अजितदादा झुकले असे चित्र निर्माण केले जातेय परंतु तशी वस्तुस्थिती नाहीय. एनडीएच्या शिर्षस्थ नेत्यांसोबत आपले अजितदादा पहिल्या रांगेत बसले ही आपल्यासाठी आणि पक्षासाठी अभिमानास्पद बाब आहे हे कार्यकर्त्यांनी प्रत्येकवेळी सांगण्याची गरज आहे," असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

Web Title: Defamation campaign by opponents because Ajit pawar nationalists are more feared says Sunil Tatkare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.