कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे व डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणातील संशयित आरोपी वीरेंद्र तावडे याला भेटू न दिल्याप्रकरणी, आरोपीच्या वकिलांनी पोलिसांच्या विरोधात दाखल केलेली अवमान याचिका सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. पाटील यांनी बुधवारी फेटाळून लावली. डॉ. दाभोलकर हत्येप्रकरणातील संशयित वीरेंद्र तावडे याला पानसरे हत्येप्रकरणी ‘एसआयटी’ने अटक केली होती. ‘एसआयटी’च्या ताब्यात असताना अॅड. समीर पटवर्धन व वीरेंद्र इचलकरंजीकर यांना त्याची भेट घेण्यास न्यायालयाने परवानगी दिली होती, परंतु पोलिसांनी या दोघांनाही भेट नाकारल्याने त्यांनी अवमान याचिका दाखल केली होती. त्यावर विशेष सरकारी वकील चंद्रकांत बुधले यांनी हरकत घेत, ४ सप्टेंबरला तावडे याला पोलिसांचे विशेष पथक तपासासाठी पनवेलला घेऊन गेले होते. त्याची पूर्वसूचना आरोपीच्या वकिलांना दिली होती. त्यानंतर, दि. १६ सप्टेंबरपर्यंत तावडेची वकिलांना भेट दिली आहे. आम्ही कोणत्याही आदेशाचा भंग केला नसल्याचे सांगितले होते. (प्रतिनिधी)
पोलिसांच्या विरोधातील अवमान याचिका फेटाळली
By admin | Published: November 17, 2016 4:01 AM