ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. 29 - इंग्लंडच्या विरोधात टीम इंडिया आज दुसरा टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल, पहिल्या टी-20मधील पराभवानंतर हा सामना जिंकण्याचा टीम इंडियावर दबाव असणार आहे. नागपुरात होणा-या सामन्यात टीम इंडियासाठी विजय खूपच महत्त्वाचा आहे. मात्र जर टीम इंडियाला हा सामना पुन्हा गमवावा लागल्यास कर्णधार कोहलीच्या नावावर टी-20 सीरिजमध्ये पराभवाचा नवा रेकॉर्ड नोंदवला जाऊ शकतो. ज्याप्रमाणे टीम इंडिया टेस्ट आणि वन-डे सीरिज जिंकल्यानंतर टी-20 सीरिज खेळण्यासाठी मैदानात उतरली, ते पाहता कोहलीची टीम आज मैदानावर आव्हान कायम राखण्याच्या निर्धाराने उतरणार आहे. तीन टी-20 मालिकेतला दुसरा सामना आज नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघ स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून इंग्लंडनं सीरिजमध्ये 1-0नं आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात भारतीय गोलंदाज प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यामुळे या सामन्यात गोलंदाजांवर चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन करण्याचा दबाव असणार आहे. पहिल्या सामन्यात धोनीने 36, तर रैनानं 34 धावांची सर्वाधिक खेळी केली होती. त्यावेळी इतर कोणताही फलंदाज जास्त काही करू शकला नाही. टीम इंडियाचा सलामीचा फलंदाज लोकेश राहुलही काही खास कामगिरी करू शकला नाही. आजच्या सामन्यात ऋषभ पंतला संधी मिळू शकते. पहिल्या सामन्यात कोहली, युवराज, मनीष पांडे यांचं अपयश टीम इंडियासाठी चिंतेचं कारण ठरलं होतं, त्यामुळे संघ व्यवस्थापन पुन्हा एकदा अजिंक्य रहाणेला संधी देण्याची शक्यता आहे. पहिल्या सामन्यात अश्विन आणि रवींद्र जडेजाला आराम दिला होता. मात्र या निर्णायक सामन्यात त्या दोन्ही गोलंदाजांना टीम इंडियाकडून संधी मिळण्याची शक्यता आहे. कानपुरात परवेझ रसूल आणि स्पिनर युजवेंद्र चहल स्वतःची छाप पाडण्यात अपयशी ठरले होते. तरीही चहलने दोन बळी मिळवले होते. मात्र रसूल सपशेल अपयशी ठरला होता. स्पिन गोलंदाजांसारखी टीम इंडियाचे वेगवान गोलंदाज आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमारही वेगाचा मारा त्या सामन्यात दाखवू शकले नव्हते.भारत (संभाव्य संघ )- विराट कोहली(कर्णधार), महेंद्र सिंह धोनी(यष्टिरक्षक), युवराज सिंह, सुरेश रैना, लोकेश राहुल, ऋषभ पंत, मंदीप सिंह, मनीष पांडे, हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, आशिष नेहरा, जसप्रीत बुमराह, परवेझ रसूल, अमित मिश्राइंग्लंड (संभाव्य संघ)- इयॉन मॉर्गन(कर्णधार), जो रुट, जेसन रॉय, जॉनी बेयरस्टो, मोइन अली, सॅम बिलिंग्स, जोस बटलर, जॅक बॉल, लियाम डॉसन, क्रिस जॉर्डन, लियाम प्लंकेट, आदिल रशीद, बेन स्ट्रोक्स, डेव्हिड विली आणि टायमल मिल्स
पराभवामुळे विराटच्या नावे होऊ शकतो नवा रेकॉर्ड
By admin | Published: January 29, 2017 4:44 PM