जालना - शिवसेनेचा मराठवाड्यातील बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात चंद्रकांत यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेल्या चंद्रकांत खैरे यांचा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज जालना येथे दिली. दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज दुष्काळग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी जालना येथे आले आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राळेगावच्या चारा छावणीला भेट दिली. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना शिवसेना दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी नेहमी त्यांच्यासोबत राहील, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. यावेळी लोकसभा निवडणुकीत चंद्रकांत खैरे यांच्या झालेल्या पराभवाबाबत उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. चंद्रकांत खैरे यांचा झालेला पराभव हा माझा पराभव आहे, काही झालं तरी औरंगाबाद सोडणार नाही, असे ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेच्या यशाबाबत शंका उपस्थित करण्यात येत होत्या. मात्र शिवसेनेचे 18 खासदार निवडून आले. दिल्लीत मला जो काही मानसन्मान मिळत आहे, तो तुमच्यामुळेच मिळत आहे, असेही त्यांनी सांगितले.
चंद्रकांत खैरे यांचा पराभव हा माझा पराभव - उद्धव ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2019 12:55 PM