राज्यात महायुतीचा पराभव निश्चित, मविआच्या १८३ जागा निवडून येणार, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2024 07:18 PM2024-08-09T19:18:48+5:302024-08-09T19:24:51+5:30
Prithviraj Chavan : राज्यातील महायुतीचे सरकार रेट लिस्ट वर चालतं आहे. राज्यात कधी घडलं नव्हतं हे सरकार फक्त लुबाडायचं काम करत आहे, अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर केली आहे.
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून तयारी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत राज्यात मिळालेल्या यशानंतर महाविकास आघाडीचा आत्मविश्वास चांगलाच वाढलेला दिसत आहे. त्यामुळं गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या सर्वच घटक पक्षांच्या अनेक बैठका सुरु आहेत. तसंच प्रत्येक पक्षाकडून दावे-प्रतिदावे केले जाऊ लागले आहेत. यातच आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या १८३ जागा जिंकून येतील, असा दावा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
राज्यात महायुतीचा पराभव निश्चित आहे. कारण महाविकास आघाडीला लोकसभेत एकूण ६५ टक्के जागा मिळाल्या होत्या. त्यावरून विधानसभेतही ६५ टक्के म्हणजे हा आकडा एकूण १८३ वर जात आहे. त्यापेक्षाही आम्हाला विधानसभेत जास्त जागा मिळतील, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. याचबरोबर, राज्यातील महायुतीचे सरकार रेट लिस्ट वर चालतं आहे. राज्यात कधी घडलं नव्हतं हे सरकार फक्त लुबाडायचं काम करत आहे, अशी टीका देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी महायुतीवर केली आहे.
दरम्यान, गेल्यावेळी झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत पाहयला मिळाली होती. यात महाविकास आघाडीने राज्यातील ४८ जागांपैकी ३१ जागांवर दणदणीत विजय मिळवला. तर महायुतीच्या वाट्याला फक्त १७ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळं राज्यात महाविकास आघाडीतील नेत्यांचा आत्मविश्वास वाढलेला दिसून येत आहे.