मेघे, रेड्डी विजयी : पडोळे, अमोल देशमुख, वाडीभस्मे पराभूतनागपूर : निवडणुकीच्या तोंडावर पक्ष बदलवून रिंगणात उतरणाऱ्या उमेदवारांपैकी काहींना जनतेने स्वीकारले तर काहींना नाकारले. ज्यांना स्वीकारले त्यात समीर मेघे (हिंगणा), डी.एम. रेड्डी (रामटेक) या दोन उमेदवारांचा तर ज्यांना नाकारले त्यात दीनानाथ पडोळे (दक्षिण नागपूर), अमोल देशमुख (रामटेक) आणि योगेश वाडीभस्मे (रामटेक) यांचा समावेश आहे.राजकारणात पक्षनिष्ठा पाळण्याचे दिवस हद्दपार झाले. सत्तेजवळ पोहोचण्यासाठी जो पक्ष सोयीचा असेल त्याची कास धरण्याची वृत्ती गेल्या काही वर्षांपासून राजकारणात बळावली. यापासून एकही राजकीय पक्ष सुटला नाही. लोकसभेच्या निवडणुकीत मोदी लाटेत इतर पक्षांची धूळधाण झाल्यावर भाजपकडे येणाऱ्यांचा ओघ वाढला. या संधीचा फायदा घेत मूळ पक्षाचा त्याग करून भाजपची उमेदवारी काहींनी घेतली. त्यांचे भाग्य फळफळले. यात मेघे आणि रेड्डी यांचा समावेश करता येईल. भाजप वगळता इतर पक्षात उमेदवारीसाठी गेलेल्यांना मात्र मतदारांनी नाकारले. त्यात दीनानाथ पडोळे, अमोल देशमुख आणि योगेश वाडीभस्मे यांचा समावेश करावा लागेल. दत्ता मेघे यांच्यासोबतच त्यांचे पुत्र व युवक काँग्रेसचे नेते समीर भाजपवासी झाले होते. भाजपने त्यांना हिंगण्यातून लढण्यास सांगितले. तेथे त्यांची लढत राष्ट्रवादीचे नेते व माजी मंत्री रमेश बंग यांच्याशी होती. २००९ च्या निवडणुकीत पराभूत झाल्यावर बंग यांनी मतदारसंघाशी संपर्क तोडला नव्हता. उलट त्यांनी बांधणी केली होती. त्यामुळे त्यांच्यापुढे समीर आव्हान उभे करू शकेल, असे वाटत नव्हते. पण जनतेने समीर यांच्या बाजूने कौल दिला. भाजप प्रवेशाचा त्यांना फायदा झाला. रामटेक मतदारसंघात तीन दलबदलू उमेदवारांनी आपले भाग्य आजमाविले. त्यात डी.एम. रेड्डी, अमोल देशमुख आणि योगेश वाडीभस्मे यांचा समावेश आहे. रेड्डी पूर्वी गोंडवाना गणतंत्र पार्टीत होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि निवडणुकीच्या तोंडावर ते भाजपमध्ये गेले. त्यांच्या नशीबाने युती तुटली. भाजपला उमेदवार पाहिजे होता. रेड्डींची लॉटरी लागली. ते विजयी झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांचे पुत्र अमोल यांना पराभव पत्करावा लागला. भाजप-आम आदमी पार्टी आणि आता मनसे असा राजकीय प्रवास करणारे योगेश वाडीभस्मे यांनाही जनतेने नाकारले. दक्षिण मतदारसंघात काँग्रेसमधून राष्ट्रवादीत गेलेले विद्यमान आमदार दीनानाथ पडोळे यांनाही पराभव पत्करावा लागला. (प्रतिनिधी)
दलबदलू तरले अन् हरलेही !
By admin | Published: October 20, 2014 12:38 AM