मुंबई: स्वतंत्र भारतात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या वाटेला अवहेलनाच आली. स्वातंत्र्यानंतर गांधी हत्येचा लाजिरवाणा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. तर, ज्या अंदमानात त्यांनी कारावास भोगला त्या अंदमानात त्यांच्या विचारांचा फलकसुध्दा अपमानकारक पध्दतीने काढण्यात आला. समाजाने केलेल्या अवहेलनेनंतरही ते व्यक्ति म्हणून स्वाभिमानानेच जगले, असे परखड मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले.सावरकरांच्या पन्नासाव्या आत्मार्पण दिनानिमित्त सावरकर राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्र मात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जांबुवतराव धोटे, स्मारकाचे अरुण जोशी आदी उपस्थित होते. भागवत म्हणाले की, स्वतंत्र भारतात सावरकरांची अवहेलना झाली, तरी त्यांनी या समाजाच विचार केला आणि त्यासाठीच सावरकर जगले. समाजाच्या दोषांबद्दल फटकार जरूर लगावली, पण त्याचा कधी अधिक्षेप होवू दिला नाही. इंग्रजांनी भारतीय समाजात पेरलेले भ्रम दूर करून समाजाला कर्तव्याचा बोध करु न दिला. सावरकरांनी केवळ विचार मांडले नाही तर तसे जगले. पक्ष, व्यक्तिगत हिताचा त्यांनी कधी विचारही केला नाही, मांडला तो केवळ समग्र राष्ट्राचा विचार. सावरकरांनी इंग्रजांनी भारतीय समाजात पेरलेला भ्रम दूर केला. कालसापेक्ष व्याख्या करतानाच हिंदुत्वाभोवती चिकटलेला संकुचितपणा दूर करण्याचे महत्वपूर्ण काम केले असल्याचे भागवत यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
स्वतंत्र भारतात सावरकरांची अवहेलना-मोहन भागवत
By admin | Published: February 27, 2015 2:50 AM