मुंबई : पावसाळा सुरू झाल्यावर साथीच्या आजारांमध्ये मलेरिया, डेंग्यू, स्वाइन फ्लू हे आजार डोक वर काढतात. २००९ मध्ये मुंबईत मलेरियाने थैमान घातले होते. मुंबईत मलेरियामुळे अनेकांचा मृत्यू झाला होता. पण २०१० ते २०१४ या कालावधीत मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण १७ टक्क्यांनी घटले असल्याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांकडून मिळाली. जागतिक मलेरिया दिनानिमित्त फॅमिली वेलफेअर अॅण्ड रिसर्च सेंटरतर्फे (एफडब्लूटीआरसी) एका परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत डॉक्टर आणि या विषयातील तज्ज्ञ सहभागी झाले होते. ‘चांगल्यासाठी मलेरियाचा नाश करा’ या संकल्पनेवर या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. फुंडे यांनी मुंबईतील मलेरियाची सद्य:स्थिती मांडली. डॉ. फुंडे यांनी सांगितले, की मलेरिया हा डासांमुळे होतो. त्यामुळे स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. यासाठी महापालिका काम करीत आहे. २००९ मध्ये वाढलेल्या मलेरियांच्या रुग्णांमुळे पालिकेने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला होता. त्याचा फायदा झालेला दिसून येत आहे. २०१० मध्ये मुंबईत मलेरियामुळे १४५ जणांचा मृत्यू झाला होता. २०१४ मध्ये हे प्रमाण ५ वर आले आहे. त्यामुळे मुंबईत मलेरिया नियंत्रणात आणण्यास महापालिकेला यश आले आहे. या परिषदेला ‘एफडब्लूटीआरसी’चे (मुंबई) संचालक डॉ. दीपक राऊत यांनी कोलकाता, उत्तर पूर्वेकडील राज्यातील मलेरियाविषयीचे अनुभव सांगितले. केईएम रुग्णालयाचे डॉ. आर. आर. शिंदे यांनी मलेरियाविषयी परिपूर्ण संकल्पना विशद केली. समाजाच्या गरजेप्रमाणे मलेरियाविषयी वेगळा विचार होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. ‘डास उत्पत्तीक्षेत्र शोधक’ ही संकल्पना राजन नारिंग्रेकर यांनी सांगितली. (प्रतिनिधी)
मलेरियाचा मृत्यूदर घटला
By admin | Published: April 26, 2016 2:32 AM