ऑनलाइन लोकमतपुणे, दि. २१ : अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या डॉ. विरेंद्रसिंह तावडेंवरील आरोप निश्चिती करण्याची मागणी अॅड. संजीव पुनाळेकरांनी केली आहे. याबाबतचा अर्ज न्यायालयामध्ये सादर करण्यात आला असून तावडेविरुद्ध सप्टेबर महिन्यात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात सुरू असून पुढील सुनावणी 3 नोव्हेंबर रोजी होणार आहे. डॉ. नरेंद्र दाभोलकरांची 20 आॅगस्ट 2013 रोजी हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांनी तपास केला. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात आला.
महर्षी वि. रा. शिंदे पुलावर जेव्हा दाभोलकरांची हत्या झाली त्यावेळी आसपासच्या परिसरात साफसफाईचे काम करणा-या सहा कर्मचा-यांची साक्ष घेण्यात आली होती. या साक्षिदारांनी गोळीबाराचा आवाज ऐकला होता तसेच आरोपींना काळ्या रंगाच्या मोटारसायकलवरुन जाताना पाहिल्याचेही सांगितले होते. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या पिस्तूलाचा बॅलेस्टिक अहवाल परदेशातून मागविण्यात आला असून तो आल्यानंतर तपास करायचा आहे. फरार आरोपी व तावडे यांच्या मोटारसायकलींचा तपास करायचा असल्याचे सीबीआयने या आरोपपत्रात नमूद केलेले आहे.
बॅलेस्टीकचा अहवाल परदेशातून येण्याची वाट पाहिल्यास खटल्याचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने तावडेवरील आरोप निश्चित करा अन्यथा खटल्यामधून सोडा अशी मागणी अर्जाद्वारे केल्याची माहिती अॅड. संजीव पुनावळे यांनी दिली. आरोपपत्रासोबत सादर करण्यात आलेल्या टिपणांमध्ये विविध साक्षीदारांच्या साक्षी, पुरावे, सीसीटीव्हीमध्ये दिसून आलेली संशयितांची छायाचित्रे, रेखाचित्रे, वीरेंद्रसिंह तावडे याच्या घरी आणि सनातन संस्थेवरील छाप्यात आढळून आलेली वेगवेगळी कागदपत्रे, सनातन वृत्तपत्राची अनेक बातम्यांची कात्रणे, विविध वृत्तपत्रांमध्ये आलेल्या बातम्यांची कात्रणे, डॉ. दाभोलकर व अंधश्रद्धा निर्मूलन समितीविषयी सनातनमध्ये छापण्यात आलेली व्यंगचित्रे यांचा समावेश आहे.