Bageshwar Baba: गेल्या काही दिवसांपासून बागेश्वर धाम पीठाचे पीठाधीश्वर धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज म्हणजेच बागेश्वर बाबा चर्चेत आहेत. मात्र, बागेश्वर बाबाबद्दल पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. बागेश्वर बाबाने संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांबद्दल एक विधान केले असून, यावरून आता संतप्त प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. यातच आता देहू संस्थानकडून बागेश्वर बाबाने केलेल्या विधानावर प्रतिक्रिया आली असून, विश्वस्तांनी सहिष्णूतेची भूमिका घेतल्याचे सांगितले जात आहे.
संत तुकाराम महाराष्ट्राचे एक असे महात्मा ज्यांची पत्नी त्यांना रोज काठीने मारत होती. कुणीतरी त्यांना विचारले की तुम्ही पत्नीकडून मार खातात, तुम्हाला लाज वाटत नाही का? यावर संत तुकाराम म्हणाले की देवाची कृपा आहे की मला मारणारी पत्नी मिळाली. यावर त्या व्यक्तीने विचारले की यामध्ये देवाची कृपा काय? तर संत तुकाराम म्हणाले, जर प्रेम करणारी पत्नी मिळाली असती, तर मी देवावर प्रेम केले नसते, पत्नीच्याच नादात अडकलो असतो. मारणारी पत्नी मिळाली तर ती संधी तरी देतेय की, माझ्या नादात कुठे अडकलास जा प्रभू रामाच्या चरणी जा, असे बागेश्वर बाबा म्हणत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होते आहे.
अगोदर सविस्तर माहिती घ्यावी मगच बोलावे
देहू संस्थानचे विश्वस्त माणिक महाराज मोरे यांनी यावर भाष्य केले आहे. तुकाराम महाराजांच्या पत्नी आमच्या मातोश्री आहेत. ज्यांनी तुकोबारायांना घास घातल्याशिवाय अन्नाचा कन घेतला नाही. तुकाराम महाराजांसाठी ज्यांनी आयुष्यभर त्यागाची भूमिका घेतली, त्यांच्याबद्दल असे विधान चुकीचे आहे. त्यांच्या बाबतीत ऐकीव माहितीद्वारे चुकीचे वक्तव्य करु नये. चुकीचे वक्तव्य करू नयेत. अगोदर सविस्तर माहिती घ्यावी मगच बोलावे. वारकरी सांप्रदाय हा सहिष्णू आहे. आम्हीही त्यांना माफ करतो, असे माणिक महाराज मोरे यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रातील तमाम वारकऱ्यांना आवाहन करतो की यावर कोणतीही प्रतिक्रिया देऊ नका. संतांवर कोणी काही बोलू नये म्हणून यावर कायदा बनवावा. जेणेकरून अशा गोष्टींना पायबंद बसेल, असे माणिक महाराज मोरे यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बागेश्वर धामचे धीरेंद्रशास्त्री यांनी जगद्गुरू तुकाराम महाराजांबद्दल बोलताना एक चुकीचा संदर्भ दिला आहे. ज्यातून संत तुकाराम आणि त्यांच्या धर्मपत्नींच्या प्रतिमेला ठेच पोहोचली आहे. यामधून केवळ वारकरी संप्रदायाचा नाही तर संबंध महाराष्ट्राचा अपमान झाला आहे आणि म्हणून आम्ही मागणी करतो, की त्यांनी लवकरात लवकर जगद्गुरू तुकाराम महाराजांची माफी मागावी, अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे आचार्य तुषार भोसले यांनी केली आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"