काँग्रेसचा घोळ पाहून उद्धव ठाकरे हताश, एका वाक्यात मांडली उद्विग्नता
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2020 04:53 AM2020-01-04T04:53:02+5:302020-01-04T13:26:50+5:30
काही खात्यांसाठी अजूनही आग्रह; मंत्री, राज्यमंत्री अस्वस्थ
मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होऊन आता पाच दिवस उलटले असले, तरी अद्याप खातेवाटप मात्र झालेले नाही. काही खात्यांबाबत काँग्रेस नेते अद्यापही आग्रही असल्याने हे खातेवाटप रखडल्याची माहिती आहे. मात्र, लांबत चाललेल्या या खातेवाटपामुळे काँग्रेस कार्यकर्ते संतापले असल्याचे समजते. इतके दिवस खातेवाटप रेंगाळल्यामुळे शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही अस्वस्थता आहे.
मंत्री व राज्यमंत्र्यांना आपल्याला कोणते खाते मिळणार, हे समजू शकलेले नाही. खात्याविना मंत्रालयात बसायचे कसे, लोकांना भेटायचे कसे, कोणत्या अधिकाऱ्यांसह बैठका घ्यायच्या आणि त्यांना सूचना तरी काय द्यायच्या, असा प्रश्न या मंत्री आणि राज्यमंत्र्यांना पडला आहे.
शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी सत्तेवर येण्यापूर्वीच तिन्ही पक्षांकडे कोणती खाती असतील, हे निश्चत झाले आहे. खातेवाटप झालेले आहे. त्यामुळेच काँग्रेसकडे कोणती खाती असतील, याची माहिती प्रभारी मल्लिकार्जुन खरगे, सरचिटणीस के. सी. वणुगोपाल यांना आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या समक्ष हे खातेवाटप झाले होते. असे असताना काँग्रेसचे मंत्री दुसºया खात्यासाठी का आग्रही आहेत? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
शिवसेनेने मात्र अतिशय सामंजस्याची भूमिका घेत, त्यांच्या वाट्याला आलेली सांस्कृतिक कार्य व बंदरे विकास ही दोन खाती काँग्रेस पक्षाला देण्याची तयारी दर्शविली आहे. मात्र, तरीही काँग्रेस नेते आणखी काही खात्यांसाठी आग्रही असल्याची माहिती आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘आता कुठे तरी हे थांबवा,’ अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते.
मात्र, मंत्रिमंडळ बैठकीत वादावादी झाल्याचे वृत्त उपमुख्यमंत्री अजित पवार व कॅबिनेट मंत्री अशोक चव्हाण यांनी फेटाळून लावले आहे.
ज्यांचे आमदार जास्त त्यांचा पालकमंत्री
ज्या जिल्ह्यात ज्या पक्षाचे आमदार जास्त आहेत, त्यांना संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यात येणार आहे. मात्र काही जिल्ह्यांबाबत निर्णय बाकी आहे. लवकरच खाते वाटप होईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘लोकमत’ला दिली.