प्रमोद गवळी, नवी दिल्लीमागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने एअर इंडियाला ९० टक्के आॅन टाइम परफॉर्मन्सचे (वेळेवर उड्डाण) लक्ष्य निर्धारित करण्यास सांगितले होते, परंतु त्याचा परिणाम अद्यापही दिसलेला नाही. त्यामुळे या विमान कंपनीचा ओटीपी आजदेखील ७९ टक्क्यांच्या वर नाही. मुंबईतून उड्डाण करणाऱ्या विमानांचा ओटीपी त्यापेक्षाही कमी म्हणजे ७४.८ टक्के आहे.नागरी उड्डयण राज्यमंत्री डॉ. महेश शर्मा यांनी राज्यसभेत ही माहिती दिली. काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनी या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉ. शर्मा बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘१ एप्रिल २०१५ पासून तर ३१ मार्च २०१६ पर्यंतच्या काळात एयर इंडियाच्या नेटवर्कअंतर्गत एकूण १,५१,९९० उड्डाणे करण्यात आली. त्यात ३२,८४३ उड्डाणे अशी आहेत की, ज्यांची १५ मिनिटांपेक्षा जास्त विलंबाने उड्डाण केले आहे. याच काळात मुंबईवरून २२,४०१ पैकी ५६०३ उड्डाणांना १५ मिनिटांपेक्षा जास्त विलंब झाला होता.’विमान उड्डाणांमध्ये होणाऱ्या विलंबामागे ‘रिअॅक्शनरी’चे सर्वांत मोठे योगदान आहे. याचा अर्थ, आधी येणारे विमान उशिरा पोहोचले की, दुसऱ्या विमानाला विलंब होतो किंवा एखाद्या विमानाने उशिरा उड्डाण केले की, त्यानंतरच्या दुसऱ्या विमानाच्या उड्डाणासही उशीर होतो. धावपट्टी ०९/२७ ची घोषित क्षमता प्रतितास ४५ विमाने आवागमन आणि धावपट्टी १४/३२ ची घोषित क्षमता प्रतितास ३५ विमाने आवागमन एवढी आहे. संचालनासाठी एका वेळी केवळ एकाच धावपट्टीचा वापर केला जाऊ शकतो,’ असे डॉ. शर्मा यांनी या वेळी सांगितले.>डॉ. शर्मा म्हणाले, ‘सर्व ए ३२० फॅमिली विमाने उड्डाणयोग्य आहेत. कारण अनुमोदित अनुसूची अथवा कार्यक्रमानुसार त्यांची देखभाल केली जाते. त्यामुळे या विमानांबाबत कसलीही समस्या नाही. एअर इंडियात १४ नवीन ‘ए ३२०’ विमाने खरेदी करण्याचा निर्णय एअर इंडिया बोर्डने नुकताच घेतलेला आहे.’
मुंबईत २५ टक्के विमानांना विलंब
By admin | Published: May 11, 2016 3:57 AM