विवेक भुसे- पुणे : मोबाईल अथवा कॉम्प्युटरवरुन तुम्ही एखादा मेसेज दुसऱ्याला पाठविला आणि नंतर तो डिलिट केला तरी तुमच्या मोबाईलमध्ये त्यांची मेमरी राहते. त्यामुळे डिलिट केला म्हणजे तुम्ही पुरावा नष्ट केला असे होत नाही तर तो मेसेज पुन्हा रिकव्हर करता येतो. याच पद्धतीचा वापर करुन अमली पदार्थ नियंत्रक विभागाने बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शनचा छडा लावला आहे. त्यातून ड्रग्ज कनेक्शनमध्ये एक एक माहिती समोर येऊ लागली आहे.बॉलीवूडमधील ड्रग्ज कनेक्शन समोर आल्याने लोकांना याविषयी कतुहूल निर्माण झाले आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, याच नाही तर अनेक प्रकरणात आम्ही या प्रणालीचा वापर करुन लोकांचे एकमेकांमधील संबंध, त्यांनी दिलेल्या धमक्यांचे चॅट व इतर माहिती पुन्हा रिकव्हर करुन घेत असतो.
कसे काढले जातात हे जुने चॅटतुम्ही कोणत्याही मोबाईलवरुन एखादा मेसेज पाठविला असेल व तो नंतर डिलिट केला तरी त्याच्या मेमरीत तो साठविलेला असतो. शिवाय बहुसंख्य लोक आपले व्हॉटसअॅप मेसेज बॅकअॅप म्हणून सेव्ह करुन ठेवत असतात. त्यांना ते नंतर लक्षातही नसते. फिर्यादी किंवा आरोपी यांचा मोबाईल हँड सेट ताब्यात घेतल्यावर पोलीस आपल्याकडील सॉफ्टवेअरच्या साहाय्याने त्याचा क्लोन तयार करतात. त्यामुळे मुळ मोबाईलची छेडछाड होत नाही. त्यानंतर ज्या गोष्टींची माहिती पाहिजे, त्याची यादी करुन तो क्लोन हँडसेट फॉरेन्सिक लॅबकडे पाठविला जातो. फॉरेन्सिक लॅबमध्ये अनेक वेगवेगळी सॉफ्टवेअर आहेत. त्याचा वापर करुन ते त्या हँडसेटमध्ये असलेले सर्व मेसेज पुन्हा रिकव्हर करतात. त्यातून पोलिसांना पाहिजे तरी माहिती मिळते. याशिवाय फॉरेन्सिक लॅबकडून या मेसेजबाबत एक सर्टिफिकेट दिले जाते. ते न्यायालयातही ग्राह्य धरले जाते.
याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, व्हॉटसअपकडून स्थानिक पातळीवर एक वर्षापर्यंतचा डाटा उपलब्ध होऊ शकतो. फेसबुक, जी मेल या कंपन्यांकडून जसे सहकार्य मिळते तसे व्हॉटसअॅपकडून मिळत नाही. ते माहिती देत नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर फॉरेन्सिक लॅबच्या मदतीने अशा चॅटची माहिती रिकव्हर करुन घेण्यात येते.
तुम्ही जेव्हा व्हॉटसअॅपचा वापर सुरु करता, तेव्हापासूनच सर्व माहिती व्हॉटसअॅपच्या कंपनीकडे साठविलेली असते. त्यातूनच दोन -चार वर्षांपूर्वीच्या चॅटची माहिती शब्दश पोलिसांच्या हाती लागली आहे़ त्यातूनच मग हे ड्रग्ज कनेक्शन समोर येऊ शकले आहे. पुण्यातही नक्षलवाद्यांना एल्गार प्रकरणात अटक करण्यात आली होती़ त्यावेळी त्यांच्याकडील कॉम्प्युटरची हार्ड डिक्स व इतर इलेक्ट्रॉनिक्स साहित्य जप्त करण्यात आले होते़. त्यांनी कॉम्प्युटरवरुन फाईली डिलिट केल्या असल्या तरी त्याची नोंद हार्ड डिक्समध्ये राहिलेली असते. तीच तपासात पुणे पोलिसांनी रिकव्हर करुन तपास केल्यावर त्यातून मोठ्या कटाची माहिती समोर आली होती. त्यामुळे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाद्वारे तुम्ही एखादा मेसेज, फोटो दुसऱ्याला पाठविला तर त्याची नोंद कोठेतरी झालेली असते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले आवश्यक आहे. ़़़़़़़़़अन धमकीचे मेसेज उघड झाले...दोघांनी लग्न केले़ त्यानंतर त्यांच्यात भांडणे होऊ लागली. त्यातून त्याने दुसऱ्या तरुणीशी विवाह करण्याचे निश्चित केले. तेव्हा या तरुणीने भावी वधुच्या नावाने बनावट व्हॉटसअॅप, फेसबुक पेज तयार करुन त्या तरुणाच्या मित्रमंडळीत त्यांच्याविषयी बदनामीकारक मेसेज पाठविले होते. त्याला धमकी देऊन पैशांची मागणी केली. त्यानंतर या तरुणीने ते डिलिट केले होते. सायबर पोलिसांकडे याची तक्रार आल्यावर पोलिसांनी या तरुणाचे व त्या तरुणींच्या मोबाईलचे क्लोन करुन फॉरेन्सिक लॅबला पाठविले त्यांनी ते धमकीचे सर्व मेसेज रिकव्हर करुन पोलिसांना दिले व ते मेसेज संबंधित तरुणींनेच केल्याचे सटिर्फिकेट दिले. त्या आधारावर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे.