"अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत ही दिल्लीचीही इच्छा, पण...’’, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2023 11:21 AM2023-07-24T11:21:37+5:302023-07-24T11:23:41+5:30
Ajit Pawar: अजित पवार यांनी राज्यातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपा सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे.
गेल्या चार वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलथापालथी होत असून, राज्यातील सत्तेची समिकरणं वेळोवेळी बदलत आहेत. अगदी वर्षभरापूर्वीपर्यंत भक्कम वाटणारी महाविकास आघाडी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर आता पूर्णपणे कोलमडली आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला अजित पवार यांनी राज्यातील शिवसेना शिंदे गट आणि भाजपा सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र अजित पवार हे लवकरच मुख्यमंत्री होतील, असा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात सध्या वेगवेगळ्या चर्चाही रंगल्या आहेत. त्यातच अजित पवार यांना पाठिंबा देऊन राज्य सरकारमध्ये मंत्री बनलेल्या अनिल पाटील यांनी मोठं विधान केलं आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वांनाच अजित पवार हे मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतं. मात्र त्यासाठी आवश्यक असलेला १४५ हा आकडा आमच्याकडे नाही आहे.
अजित पवार यांच्या वाढदिवसादिवशी आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदावरून केलेल्या दाव्याबाबत अनिल पाटील यांना विचारले असता, त्यांनी सांगितले की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत, असं अमोल मिटकरी एकटे म्हणाले, असं तुम्हाला वाटेल. पण ही राष्ट्रवादी काँग्रेसमधील गल्ली ते दिल्लीपर्यंतच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची भावना आहे. पण मुख्यमंत्री होण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा लागतो. तो आकडा गाठला गेला तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार हेच १०० टक्के मुख्यमंत्री होतील. मात्र या घडीला तो आकडा आमच्याकडे नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार चाललं आहे. त्या सरकारचाच इथे विचार होईल. त्यांच्या पाठीमागे आम्ही उभे राहू, असे अनिल पाटील म्हणाले.
अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं माझ्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वांना वाटतं. केवळ आम्हालाच नाही तर दिल्लीतील नेत्यांचीही तीच इच्छा आहे. आता दिल्लीत कोण कोण नेते आहेत, हे मला अधिक स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. दिल्लीतल्या नेत्यांनाही दादा एकदा मुख्यमंत्री व्हावेत, असं वाटतं असे सांगत अनिल पाटील यांनी खळबळ उडवून दिली आहे.