मुंबई : वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाला तोंड द्यावे लागत असल्याने दिल्लीत वाहनांसाठी ‘सम-विषम’ फॉर्म्युला राबवण्यात आला. मात्र या फॉर्म्युल्याची मुंबईत आवश्यकता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी स्पष्ट केले. मुंबईतील एनसीपीए येथे रस्ता सुरक्षा सप्ताहाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. परिवहन मंत्री दिवाकर रावते, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे, पोलीस आयुक्त अहमद जावेद, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन व बंदरे) गौतम चॅटर्जी, वाहतूक सह पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, मुंबईत वाहनांची संख्या कमी आहे. मुंबईत जवळपास २५ लाख वाहने धावतात. दिल्लीत यापेक्षा तिप्पट वाहने धावतात. वाहनांची संख्या आणि सध्या उपलब्ध असलेली पब्लिक ट्रान्सपोर्ट व्यवस्था पाहता सम-विषम फॉर्म्युला मुंबईसाठी आवश्यक नाही. मुंबईत पब्लिक ट्रान्सपोर्टसारखी व्यवस्था अधिकाधिक प्रमाणात उपलब्ध करून दिली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्नही केले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीत वाहनांसाठी फॉर्म्युला लागू केल्यानंतर सध्या नवीनच उद्योग सुरू झाल्याचे सांगत सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन सम-विषम नंबरच्या प्लेट वाहनांसाठी वापरल्या जात असल्याचा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. दंडाची रक्कम वाढणारनियम मोडणाऱ्या वाहनचालकांना सध्या दंड ठोठावला जातो. हा दंड फार कमी असून त्यात वाढ होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. याबाबत केंद्र सरकारकडे विधेयक असून ते लवकरच मंजूर होईल. त्यामुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि दंडही चांगला मिळू शकतो, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.आॅक्टोबरपर्यंत सीसीटीव्ही बसणाररस्ते सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने वाहतूक नियमांच्या पालनाचा विचार पुढे नेला पाहिजे. नियमांचे बंधन वाहनचालकांना घातल्यास अपघात होणार नाहीत, असे गृह राज्यमंत्री (ग्रामीण) राम शिंदे यांनी सांगितले. ९५0 कोटी रुपये खर्च करून मुंबईत आॅक्टोबरपर्यंत ६,२00 सीसीटीव्ही बसविणार असल्याचेही ते म्हणाले.
दिल्लीतील सम-विषम फॉर्म्युला मुंबईत नाही : मुख्यमंत्री
By admin | Published: January 13, 2016 4:24 AM