प्रसन्न पाध्ये, बेळगाव, बाळासाहेब ठाकरे नाट्यनगरीमहाराष्ट्रातील नाटकांसाठी दिल्लीची दारे पुन्हा खुली होण्याची शक्यता आहे. मराठी नाटक दिल्लीत पोहोचले पाहिजे, गाजले पाहिजे याच भूमिकेतून गेले वर्षभर प्रयत्न करणारे ९४व्या नाट्य संमेलनाचे अध्यक्ष अरुण काकडे यांच्या प्रयत्नांना यश येण्याची शक्यता आहे.नाट्य संमेलनाध्यक्षांना खरे तर काही अधिकार नसतात. पण रंगभूमीच्या संवर्धनासाठी अध्यक्षांनी अनुभवाच्या जोरावर काही सूचना मांडल्यास त्या पूर्ण करण्याची जबाबदारी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद घेते. अध्यक्षांनी सुचविलेल्या सर्वच गोष्टी पूर्ण होतात असे नाही. पण त्या मार्गी लावण्याच्या दृष्टीने काहीतरी प्रयत्न होताना दिसतात. काकडे यांनी पंढरपूरच्या नाट्य संमेलनात अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. वर्षभरातील ठोस कार्यक्रमाचे त्यांनी नियोजन केले. साहित्य संमेलनाध्यक्षांप्रमाणे नाट्य संमेलनाच्या अध्यक्षांनी आपल्या कार्यकाळात राज्यातील नाट्य परिषदांच्या शाखांना भेटी देण्यासाठी निश्चित स्वरुपात आर्थिक तरतूद व्हावी अशी त्यांची अपेक्षा होती. ती काही पूर्ण झाली नाही. मात्र, त्यांना आर्थिक पाठबळ दिले. प्रवासासाठी आर्थिक तरतूद झाली. दिल्लीत मराठी नाट्य महोत्सव ही संकल्पना काकडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना उलगडून दाखविली. राजधानी असल्याने सर्वच राज्यांच्या सांस्कृतिक कलांचे दर्शन तेथील रसिकांना होते. महाराष्ट्रातील सांस्कृतिक जडणघडण तेथील रसिकांना कळण्यासाठीच ही धडपड.१९५७ पासून दिल्लीवारी सुरू झाली. १९५७ ते २०११ या काळात एकंदर २५ वाऱ्या झाल्या. त्यात ३२ नाटकांचे प्रयोग झाले. सातत्याने, एवढ्या प्रदीर्घ काळात माझ्याएवढे नाट्य प्रयोग कुणी केलेही नसतील. पहिले निमित्त झाले ते पुण्यातील प्रोग्रेसिव्ह ड्रामॅटिक असोसिएशनच्या ‘जगन्नाथाचा रथ’ या नाटकाचे. दिल्लीकरांना मराठी संस्कृतीची ओळख करून देण्याचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राकडून महाराष्ट्र शासनाने सुरू केले. ५ नोव्हेंबर हा रंगभूमी दिन म्हणूनच साजरा होतो. या दिनानिमित्ताने शासनाने दिल्लीत मराठी नाटकांचे प्रयोग सुरू केले होते. निरनिराळ्या नाट्य संस्थांना आमंत्रित करून त्या त्या वर्षातील चांगल्या नाटकांचे प्रयोग दिल्लीकरांसाठी सुरू केले. त्यासाठी खर्चाची सर्व तरतूद होती. मराठीबरोबर हिंदीत अनुवाद करून प्रयोगही सादर केले गेले. त्यात विजय तेंडुलकर यांच्या विजया मेहता दिग्दर्शित ‘मी जिंकलो मी हरलो’ या नाटकाचा हिंदी अनुवाद ‘मैं जीता मैं हारा’ या नाटकाचा समावेश होता.
मराठी नाटकांसाठी उघडणार दिल्लीद्वार
By admin | Published: February 08, 2015 11:42 PM