मुंबई : दिल्ली विधानसभा निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलेच तापले असून सत्ताधारी-विरोधी पक्षाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप होत असल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आम आदमी पार्टीतील आमदाराने विधानसभा उमेदवारीचं तिकीट देण्यासाठी 10 कोटी रुपये मागितल्याचा गंभीर आरोप स्वपक्षावर केला असल्याने खळबळ उडाली आहे.
बदरपुर विधानसभा मतदारसंघाचे आपचेआमदार एनडी शर्मा यांनी आरोप केला आहे की, आपचे नेते व दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी त्यांना उमेदवारी देण्यासाठी 10 कोटी रुपये मागितले होते. सिसोदियांच्या मागणीमुळे आपल्याला धक्काच बसला असल्याचे शर्मा म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, मला सिसोदिया यांनी आपल्या घरी बोलवले होते. त्यावेळी त्यांनी मला संगीतीले की, पक्षातील राम सिंह हे बदरपुर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यासाठी 20 ते 21 कोटी रुपये देण्यासाठी ते तयार आहेत. मात्र तुम्ही फक्त 10 कोटीचं द्या अशी मागणी सिसोदिया यांनी केली असल्याचा आरोप शर्मा यांनी केला आहे.
तर सिसोदियांच्या 10 कोटी रुपयाच्या मागणीला मी विरोध केला असून, पैसे देणार नसल्याचे त्यांना स्पष्ट सांगितले असल्याचे सुद्धा शर्मा म्हणाले. शर्मा यांनी आम आदमी पक्षातील पदाचा राजीनामा दिला आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे सुद्धा ते म्हणाले आहे. तर आम आदमी पक्षाकडून सुद्धा त्यांचे तिकीट कापण्यात आले आहे.