मुंबई : मुंबई व ठाणे शहराला जोडणारे मेट्रो प्रकल्प त्वरित मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. डी. एन. नगर ते मंडाले मेट्रो-२ ब आणि वडाळा-घाटकोपर-मुलुंड-ठाणे-कासारवडवली मेट्रो-४ मार्गाच्या अंमलबजावणीसाठी दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची (डी.एम.आर.सी.) अंतरिम सल्लागार म्हणून मंगळवारी नेमणूक करण्यात आली. एमएमआरडीएच्या कार्यकारी समितीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये समितीने दोन्ही मेट्रोसाठी डी.एम.आर.सी.ची नेमणूक करण्यासाठी प्रशासकीय मंजुरी दिली. ही बैठक राज्याचे मुख्य सचिव आणि एमएमआरडीएच्या समितीचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रीय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मेट्रो-२ ब आणि मेट्रो-४ मार्गासाठी निविदा दस्तावेज तयार करणे, निविदा मागवणे आणि त्याचे मूल्यांकन करण्यास एमएमआरडीएला मदत करण्याचे काम दिल्ली मेट्रोकडून केले जाईल. मेट्रो-२ ब प्रकल्प हा २३.६ किलोमीटरचा तर मेट्रो-४ हा ३२ किलोमीटर लांबीचा प्रकल्प आहे. त्याचप्रमाणे १६.५ किलोमीटर लांबीच्या अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-७ साठी आणि मेट्रो-२ ब साठी सर्वसाधारण सल्लागार म्हणून आएशा इंजिनीअरिंग आरकी टेक्चुरा यांची नेमणूक करण्यास संमती दिली असल्याची माहिती एमएमआरडीएकडून देण्यात आली. या दोन्ही मार्गांची अंमलबजावणी होत असताना विविध स्तरांवर बांधकाम, उभारणी, डेपो आणि यंत्रणा यावर देखरेख ठेवणे अपेक्षित आहे. वाढती लोकसंख्या आणि वाहनांची संख्या, उपनगरीय गाड्यांमधील बेसुमार गर्दी, त्यामुळे होणारे अपघात पाहता यातून सुखकर प्रवास देण्यासाठी मेट्रो रेल्वेचा पर्याय मुंबईकरांसाठी दिसत आहे. त्यादृष्टीनेच सरकार पाऊल उचलत असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)>माहीमच्या प्रकल्पबाधितांना सदनिका कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो-३ प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या माहीम नया नगर येथील ३२७ कुटुंबांना मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या वतीने लॉटरी पद्धतीने मंगळवारी सदनिका जाहीर करण्यात आल्या. कुटुंबांना सदनिका वाटप पत्राच्या हस्तांतरणाची प्रक्रिया २१ सप्टेंबरपासून सुरू केली जाईल. बाधितांपैकी २९८ घरगुती व ११ घरगुतीवजा व्यावसायिकांना कुर्ला पश्चिममधील प्रीमियम येथे तर १८ व्यावसायिक युनिटना गोवंडीतील गौतमनगर येथे स्थानांतरित केले जाईल. मेट्रो-३ मार्गाच्या बांधकामांकरिता मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन एकूण २,८0७ कुटुंबीयांचे पुनर्वसन करणार आहे. मेट्रो-३ च्या टनल बोरिंग मशिनच्या रोपणाकरिता नया नगर येथील जमीन लागणार आहे. कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी संपूर्ण प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी संगणकीय लॉटरी पद्धतीचा वापर केल्याचे सांगितले. प्रकल्प बाधितांसाठी विविध सामाजिक विकास कार्यक्रम राबवण्याचा आमचा मानस असल्याचे त्या म्हणाल्या.
दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनची अंतरिम सल्लागार म्हणून नेमणूक
By admin | Published: September 21, 2016 5:55 AM