मुंबई - मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत दिल्लीतील जनतेने भाजपला देशद्रोही घोषित केल्याची जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. दिल्ली विधानसभेच्या निकालाचे अपडेट हाती येत असून अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वातील आम आदमी पक्षाने मोठी आघाडी घेतली आहे. दिल्लीत आपला स्पष्ट बहुमत मिळेल, असेच दिसून येत आहे. त्याच, पार्श्वभूमीवर मलिक यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत संपत्ती, शक्ती आणि विरोध पराभूत होऊन आज विकास आणि विश्वास जिंकल्याचे नवाब मलिक म्हणाले. मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणुकीत जनतेला देशद्रोहविरोधात मतदान करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार दिल्लीतील जनतेने दाखवून दिले आहे. मोदींचा सल्ला ऐकून दिल्लीतील जनतेनं मतदान प्रक्रियेतून भाजपाला देशद्रोही घोषित केल्याचे मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन म्हटले आहे.
दरम्यान, दिल्लीत आपच्या झाडूची जादू कायम राहणार की भाजपाचं कमळ फुलणार, याचा निकाल आज होणार आहे. दिल्ली विधानसभेत एकूण ७० जागा आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीनं तब्बल ६७ जागा जिंकल्या होत्या. तर भाजपाला केवळ तीन जागा जिंकण्यात यश मिळालं होतं. दिल्लीतली आपची सत्ता कायम राहील, असा अंदाज सर्वच एक्झिट पोल्सनी वर्तवला आहे. तसेच चित्र सध्या दिसत असून दिल्लीत आपने 54 जागांवर आघाडी घेतली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत भाजपाच्या जागा वाढतील, असेही आकडेवारी सांगत आहे.