मुंबई - झारखंड निवडणूक पार पडताच प्रमुख राजकीय पक्षांना दिल्ली विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. या पार्श्वभूमीवर एकमेकांवर टीका टीप्पणी सुरू असतानाच पक्षाकडून संघटन मजबूत करण्यासाठी विविध पदावरील नियुक्त्या सुरू झाल्या आहेत. दिल्लीतील काँग्रेसच्या छाणणी समितीच्या अध्यक्षपदी महाराष्ट्रातील नेते माजी खासदार राजीव सातव यांची निवड झाली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मित्रपक्षांच्या मदतीने भाजपला धुळ चारली आहे. आता त्याचीच पुनरावृत्ती दिल्लीत करण्याची काँग्रेसची तयारी आहे. मात्र दिल्लीत काँग्रेससमोर मुख्य आव्हान अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचं आहे. तर भाजपसमोर देखील आपचे आव्हान आहे.
पुढील वर्षी 15 फेब्रुवारीमध्ये दिल्ली विधानसभेचा कालावधी संपत आहे. त्यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसकडून तिकीट वाटपाची जबाबदारी राजीव सातव यांच्यावर आली आहे. दिल्ली विधानसभेत 70 जागा असून गेल्या वेळी काँग्रेसला येथून खातंही उघडता आलं नव्हतं. तर आपने 67 आणि भाजपने तीन जागा जिंकल्या होत्या. यावेळी काँग्रेसला चांगले यश मिळवून देण्याची जबाबदारी सातव यांच्यावर आली आहे.
राजीव सातव 2014 मध्ये हिंगोली मतदार संघातून लोकसभेला निवडून आले होते. मात्र त्यांनी 2019 मध्ये निवडणूक लढवली नाही. त्यानंतर आता त्यांनी काँग्रेसच्या संघटनावरच अधिक लक्ष केंद्रीत केले आहे. ते सध्या गुजरात काँग्रेसचे प्रभारी आहेत.