मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री मल्लिका शेरावत चित्रपटांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी घालत असलेल्या कपड्यांमुळे समाजावर वाईट परिणाम होत आहेत, अशी खासगी तक्रार एका उद्योगपतीने नागपूर दंडाधिकाऱ्यांकडे केली होती. त्या तक्रारीची दंडाधिकाऱ्यांनी दखल घेत कारवाईचे आदेश दिल्याने मल्लिकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेत दंडाधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही रद्द केली.दंडाधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू करण्यापूर्वी सिनेमॅटोग्राफी कायद्यातील तरतुदींचा विचार केला नाही, असे म्हणत न्या. ए. बी. चौधरी यांनी मल्लिका शेरावतविरुद्ध करण्यात आलेल्या तक्रारीवर दंडाधिकाऱ्यांनी केलेली कार्यवाही रद्द केली.यवतमाळचे उद्योगपती रजनीकांत बौलेरे यांनी २००९ मध्ये मल्लिकाविरुद्ध तक्रार केली होती. याविरुद्ध मल्लिकाने २०१० मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. या अर्जावर काहीच दिवसांपूर्वी सुनावणी झाली. या सुनावणीवेळी दोन्ही पक्षांचे वकील उपस्थित नव्हते. शेरावतच्या याचिकेमध्ये म्हटले आहे की, तिने आतापर्यंत ज्या चित्रपटांत काम केले आहे, त्या सर्व चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र दिले आहे. त्यामुळे तक्रारदाराला खासगी तक्रारीऐवजी सिनेमॅटोग्राफी कायद्यातील कलम ५(डी) अंतर्गत अन्य पर्याय उपलब्ध आहे. तसेच दंडाधिकाऱ्यांनी कार्यवाही सुरू करण्यापूर्वी सेन्सॉर बोर्डाने दिलेल्या प्रमाणपत्रांचा विचार करायला हवा होता.चित्रपटांना सेन्सॉर बोर्डाकडून परवानगी मिळाली आहे की नाही, हे कार्यवाही करण्यापूर्वी दंडाधिकाऱ्यांनी पडताळून पाहायला हवे होते, असे म्हणत उच्च न्यायालयाने शेरावतला दिलासा दिला.
मल्लिका शेरावतला हायकोर्टाचा दिलासा
By admin | Published: November 14, 2015 3:23 AM