हरीश गुप्ता - नवी दिल्ली
लोकसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सोनिया-मोदी यांच्या सदिच्छा भेटीच्या क्षणाने सामंजस्य, सभ्यता आणि सौहार्दाचे स्पष्ट संकेत मिळाले. अनपेक्षित भेटीच्या या क्षणाने सर्वाच्या मनावर अमीट छाप सोडली. रालोआ आणि विरोधी पक्ष सामंजस्याने काम करण्यास तयार असल्याचे संकेत अधिवेशनातील दहा मिनिटांच्या कामकाजादरम्यान मिळाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदीय कामकाज मंत्री एम. वेंकय्या नायडू आणि लालकृष्ण अडवाणी यांच्यासमवेत सभागृहात दाखल झाले, तेव्हा सदस्यांनी बाके वाजवून त्यांचे स्वागत केले. मोदींनी सभागृहात आल्यावर सर्वप्रथम ज्येष्ठ विरोधी पक्षनेत्यांचे अभिनंदन करणो पसंत केले. सभागृहात आल्याबरोबर आसन क्र. 1 वर विराजमान होण्याऐवजी मोदी पहिल्या रांगेत बसलेल्या विरोधी पक्ष नेत्यांकडे चालत गेले. या वेळी सोनिया गांधी सभागृहात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे मोदींनी लोकसभेतील काँग्रेस पक्षनेते मल्लिकाजरुन खरगे, एम. वीरप्पा मोइली आणि अन्य नेत्यांचे अभीष्टचिंतन केले. त्यांचे अभीष्टचिंतन करून मोदी मागे वळले आणि नेमक्या त्याचवेळी सोनिया गांधी यांनी सभागृहात प्रवेश केला. सोनिया गांधी यांना पाहून मोदी त्यांच्याजवळ चालत गेले आणि दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला. त्यांना सोनिया गांधी यांनीही स्मित करून प्रतिसाद दिला आणि आपली ब्रिफकेस त्यांच्या आसनावर ठेवून लगेच दोन्ही हात जोडून मोदींना नमस्कार केला. परस्परांचे अभिनंदन करतेवेळी त्यांच्यात अल्पसा संवादही झाला, पण त्याचा तपशील कळू शकला नाही. सोनिया गांधी आणि नरेंद्र मोदी हे आमनेसामने येण्याची बहुदा ही तिसरी वेळ होती. राष्ट्रपती भवनातील शपथविधी, सार्क देशांच्या प्रमुखांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी दिलेली मेजवानी या दोन प्रसंगांत सोनिया आणि मोदींची भेट झाली होती. परंतु त्या दोन्ही भेटीत आजच्यासारखा प्रसन्न भाव नव्हता. आजच्या या आनंदादायी भेटीमुळे निवडणूक प्रचारादरम्यान निर्माण झालेली कटुता विरून गेली.
राहुल गांधी हे थोडय़ा विलंबाने सभागृहात आले व शेवटच्या रांगेतील आसनावर विराजमान झाले. ज्योतिरादित्य शिंदे 11 वाजेनंतर आले आणि राहुल गांधी यांच्या शेजारी जाऊन बसले. लोकसभेतील चित्र यावेळी पार बदलले होते. सभागृहात जवळपास 34क् नवे चेहरे दिसत होते आणि सत्ता परिवर्तनामुळे आसन व्यवस्थेतही मोठा बदल घडून आलेला होता. आडवाणी हे मोदींच्या शेजारी बसले होते. त्यांच्या बाजूला मुरली मनोहर जोशी, रामविलास पासवान, एम. वेंकय्या नायडू, सुषमा स्वराज आणि राजनाथसिंग विराजमान झाले होते. नितीन गडकरी दुस:या रांगेत बसले होते. कदाचित पहिल्यांदाच खासदार बनल्याने त्यांना पहिल्या रांगेत येण्यास थोळा वेळ लागेल. चौथ्या रांगेतील प्रत्येकी एक आसन काँग्रेस, मुलायमसिंग यादव, सुदीप बंडोपाध्याय (तृणमूल काँग्रेस), अजरुन चरण सेठी (बिजद) आणि एम. थंबीदुराई (अण्णाद्रमुक) यांना वाटप करण्यात आले आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांच्या पक्षाचे केवळ दोनच खासदार निवडून आले असले तरी ते स्वत: माजी पंतप्रधान असल्याने त्यांना पहिल्या रांगेत आसन देण्यात आले. याशिवाय माकपला पहिल्या रांगेत आसन मिळाले. राष्ट्रवादीच्या बहुतांश ज्येष्ठ नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाला असला तरी या पक्षाला पहिल्या रांगेत एक आसन दिले जाण्याची शक्यता आहे. राजदलाही पहिल्या रांगेत आसन मिळेल. यावेळी बसपा, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक व रालोदला एकही जागा जिंकता आली नसल्याने त्यांचा सदस्य दिसला नाही.
सर्वसामान्य जनतेच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी संसद भवन परिसरात बोलताना सांगितले. देशातील जनतेने अभूतपूर्व मतदान करून 16 व्या लोकसभेचे सदस्य निवडून दिले. देशातील सर्वसामान्य जनतेच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी या लोकशाहीच्या मंदिरात सर्व प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.