Maharashtra Politics ( Marathi News ) : मुंबई : राष्ट्रवादीमध्ये फुट पडल्यानंतर आता अजित पवार गटाचे नेते हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड या दोघांमध्येही वाकयुद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपासोबत जाण्यावरून जितेंद्र आव्हाड यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देताना यांनाच सगळं कळतंय का? असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांचा एकेरी शब्दात उल्लेख करत हसन मुश्रीफ यांनी निशाणा साधला.
जितेंद्र आव्हाडांना पक्षात कोणी विचारत नाहीत. ते एकाकी पडल्यामुळे भ्रमिष्ट अवस्थेत आहेत. आमची सत्ता पहिल्यांदा गेली, तेव्हा भाजपा आणि शिंदे यांच्यासोबत जावं, यासाठी जितेंद्र आव्हाड यांनी पुढाकार घेतला होता. त्यावेळी आमदारांनी सह्या केल्या होत्या, त्यामध्ये जितेंद्र आव्हाड यांची सही एक नंबरला होती, असा दावाही हसन मुश्रीफ यांनी केला आहे. तसेच, आम्ही भाजपसोबत जाणार त्यावेळीच्या चर्चेत जितेंद्र आव्हाड नव्हतेच. माझा भाजपसोबत जायच्या निर्णयाला विरोध असता तर मी मंत्रीपदाची शपथ घेतली असती का? असा सवालही हसन मुश्रीफ यांनी यावेळी उपस्थित केला.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड?जितेंद्र आव्हड यांनी हसन मुश्रीफांवर निशाणा साधला होता. जितेंद्र आव्हाड म्हणाले की, हसन मुश्रीफ यांना विचारा कोणत्या तीन पक्षात भांडण लावण्याच काम केले. हसन मुश्रीफ यांच्यासोबत मी दहा मिनिटं तरी कधी बोललो असेल तर त्यांनी सांगावे, जेव्हा भाजपासोबत जाण्याचा हे विचार करत असतांना या हसन मुश्रीफ यांनी सर्वात आधी मला कॉल केला होता. जितेंद्र हे थांबवायला हवं, बोलायला आणि काढायला गेलो तर मी पण खूप काढू शकतो." दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि हसन मुश्रीफ यांच्यात याआधीही आरोप-प्रत्यारोप झाले आहेत. गद्दारी ही काही लोकांच्या रक्तातच असते, अशा शब्दांत जितेंद्र आव्हाडांनी याआधी हसन मुश्रीफांना उद्देशून टीका केली होती.