महसूल पंधरवड्यामध्ये योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत पोहोचवा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2024 09:08 PM2024-08-01T21:08:54+5:302024-08-01T21:12:15+5:30
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महसूल पंधरवड्यामध्ये शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने अग्रेसर राहून सर्व विभागांसह चांगले काम करावे.
मुंबई : यावर्षीपासून महसूल सप्ताह ऐवजी 'महसूल पंधरवडा' तसेच 'पशुसंवर्धन पंधरवडा' साजरा होत आहे. या कालावधीत शासनाच्या विविध योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत लाभ पोहोचवा. वयोश्री, लेक लाडकी, अन्नपूर्णा, मुख्यमंत्री माझी लाडके बहीण तसेच शेतकऱ्यांशी संबंधित विविध योजनांची चांगली अंमलबजावणी करून शासनाची चांगली प्रतिमा निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
राज्यस्तरीय महसूल दिन तसेच महसूल पंधरवडा व पशुसंवर्धन पंधरवडा-२०२४ चा शुभारंभ कार्यक्रम मंत्रालयातील परिषद सभागृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, महसूल पंधरवाडा व पशुसंवर्धन पंधरवाडा दोन्हीसाठी नागरिकांना शुभेच्छा देताना आनंद होतो आहे. नागरिक व ग्रामीण भागातील जनतेसाठी महसूल व पशुसंवर्धन देखील अतिशय महत्त्वाचे विभाग आहेत. महसूल पंधरवड्यामध्ये शासनाची प्रतिमा उंचावण्यासाठी महसूल विभागाने अग्रेसर राहून सर्व विभागांसह चांगले काम करावे.
कृषी, आरोग्य, सिंचन, जलसंपदा, सहकार यासह अन्य सर्व विभागांना एकत्र घेऊन काम करावे. अधिकाऱ्यांनी अधिक गतीमान, परस्पर समन्वय साधून नागरिकांची कामे वेळेत करण्यासोबत शासनाच्या योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून लोकाभिमूख काम करावे. जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय व ग्रामस्तरीय अधिकारी, कर्मचारी लोकांपर्यंत जावे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
पशुसंवर्धन पंधरवडामध्ये राज्यातील दूध भेसळीसारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर अतिशय कठोर काम केले जावे. भेसळ करणाऱ्यांना जरब बसेल, यासाठी कारवाई करावी. महसूल विभागाने सर्व यंत्रणच्या सहकार्याने दाखले व विविध योजनांचे लाभ नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी अगदी गाव पातळीवर जाऊन काम करावे. वयोश्री योजना, अन्नपूर्णा योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण यासह शेतकऱ्यांसाठी असलेल्या अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
महसूल विभागाने अधिक लोकाभिमुख होऊन काम करावे- उपमुख्यमंत्री
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, शासनाच्या विविध योजनांची अंमलबजावणी व उपक्रमामध्ये महसूल विभागाचे चांगले योगदान आहे. समाजातील प्रत्येक घटक यामध्ये सहभागी होत आहे. महसूल विभागाने लोकाभिमुख होत अधिक गतीमान पद्धतीने काम करावे. समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचून सर्वांच्या एकत्रित प्रयत्नाने महसूल पंधरवडा यशस्वी होईल. पोलीस विभागाच्या धर्तीवर महसूल विभागास देखील जिल्हा नियोजन समितीतून वाहने खरेदीचा निर्णय घेण्यात येत आहे.