वाशिम: गत तीन वर्षांपासून सातत्याने पडत असलेल्या दुष्काळामुळे चक्क खरीप हंगामावरच बहिष्कार टाकणार्या जामदरा गाववासीयांच्या कृषी विभागाच्या अधिकार्यांनी समस्या जाणून घेतल्या असून, त्याचे निराकरण करण्यात येणार आहे. जामदरा येथील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविण्यात येणार आहे. मानोरा तालुक्यातील जामदरा या गावातील शेतकर्यांनी दुष्काळाने त्रस्त झाल्याने यावर्षीच्या आगामी खरीप हंगामावरच बहिष्कार टाकला. दरवर्षीच शेतात लाखो रुपयांचा उत्पादन खर्च करायचा आणि निसर्गाच्या अवकृपेमुळे होत असलेल्या अल्प उत्पन्नाने शेतकर्यांच्या हाती भोपळाच राहत आहे. शेतकर्यांनी बहिष्काराचा निर्णय घेतल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत कृषी विभागाने या गावात जावून शेतकर्यांच्या भेटी घेतल्या. मानोरा तालुका कृषी अधिकार्यांनी त्यांच्या चमूसह गावात जावून गावातील शेतीची पाहणी केली, तसेच शेतकर्यांच्या समस्या कोणत्या आहेत, त्यांनी का असा टोकाचा निर्णय घेतला, याची माहिती जाणून घेतली. याचा अहवाल तयार करण्यात आला असून, अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात येणार आहे. या गावातील शेतकर्यांनी दरवर्षीच कमी उत्पन्न होत असल्याने तोट्यात शेती करण्याऐवजी शेतीच न करण्याचा निर्णय घेतला. याबाबत बोलताना जिल्हा कृषी अधीक्षक दत्तात्रय गावसाने यांनी सांगितले, की त्यानंतर गावातील पीक पद्धती बदलणे गरजेचे आहे. त्यामुळे गावातील शेतकर्यांशी बोलून त्यांना पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन करण्यात येईल. शेतकर्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. गावकर्यांनी पीक पद्धतीत बदल करून उत्पादन घेण्याची गरज आहे.
जामदरा येथील शेतक-यांना कृषी विभाग देणार दिलासा!
By admin | Published: March 14, 2016 2:07 AM