हिंगोली- आरोग्य सेवेच्या बाबतीत नेहमीच चर्चेत असलेल्या जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा जिल्हा रूग्णालयात नियोजनाचा अभाव असल्याचं दिसून येत आहे.
हिंगोली तालुक्यातील लोहगाव येथील सुरेखा पिंटू खंदारे (२५) यांना प्रसूती वेदना जाणवत असल्याने त्या जिल्हासामान्य रुग्णालयात नातेवाईकांसह २५ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता आल्या होत्या. मात्र साफसफाईच्या नावाखाली रुग्णालयाचे मुख्यप्रवेश द्वार बंद केले होते. सुरेखाच्या नातेवाईकांनी प्रवेश द्वार उघडण्याची बरीच विनंती केली. मात्र त्यांच्या विनंतीकडे कोणीच लक्ष दिले नाही. महिलेला जास्तच त्रास झाला आणि प्रवेशद्वारावरच महिलेने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तरीही महिलेजवळ कोणीच आले नव्हते. यानंतर हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी राजू ठाकूर यांनी महिलेच्या नातेवाईकांना धिर दाखवत शल्यचिकित्सक आकाश कुलकर्णी यांच्या कॅबीनकडे धाव घेतली. तेव्हा महिला कर्मचाऱ्यांनी त्या महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं.
हिंगोलीतील जिल्हा रूग्णालयामध्ये नेहमीच असे प्रकार घडत आहेत. हा प्रकार दुस-यांदा घडला आहे. त्यामुळे रुग्णालयाच्या कामकाजाबद्दल शंका कुशंका निर्माण होत आहे. आजही शल्यचिकित्सकाचा अधिकारी व कर्मचा-यांवर जराही वचक नसल्याने ते कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. तसेच अजून गंभीर बाब म्हणजे प्रत्येक वॉर्डमधील बहुतांश पंखे नादुरुस्त आहेत. अति गंभीर बाब म्हणजे कुपोषण वॉर्डमधील पंखे बंद असल्यामुळे बालकांसाठी घरुन पंखे घेऊन येण्याचे विदारक चित्र सोमवारी पहावयास मिळाले. येथील सोयी सुविधांकडे जिल्हा रुग्णालय साफ दुर्लक्ष करीत असल्याने असे प्रकार नेहमीच घडत आहेत. त्यामुळे येथे उपचारास येणारेही घाबरत आहेत.