मुंबई : महिलेच्या प्रसूतीसाठी रेल्वे पोलिसांच्या महिला हवालदारांनी मदत केल्याची घटना बुधवारी रात्री घडली. यात २२ वर्षीय महिलेला मुलगी झाली असून, सायन रुग्णालयात यशस्वी उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. घटनेत रेल्वे पोलिसांनी दाखवलेली तत्परता यामुळे महिला व बाळ दोघेही सुखरूप आहेत. बुधवारी रात्री सव्वा दहाच्या सुमारास दादर स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३वर सीएसटीला जाणारी लोकल आली. त्या वेळी महिला अपंगांच्या राखीव डब्यात असलेल्या २२ वर्षीय महिलेला प्रसूतीकळा येत होत्या. त्या वेळी डब्यात फक्त दोन ते तीन महिला प्रवासी होत्या. येत असलेल्या प्रसूतीकळा आणि अशक्तपणा असलेल्या या महिलेने मदतीसाठी आपल्या पतीला फोन केला. त्या वेळी अन्य ठिकाणी असलेल्या तिच्या पतीने तत्काळ दादर स्थानकातील स्टेशन मास्तरच्या कार्यालयाचा नंबर मिळवून तेथे फोन केला. त्यानंतर स्थानकात उद्घोषणा होऊन रेल्वे पोलीस पाठवण्याची सूचना करण्यात आली. तसेच स्थानकातील अन्य महिलांनीही पोलिसांना याची माहिती दिली. या सूचनेनंतर लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफच्या महिला कॉन्स्टेबल प्लॅटफॉर्मवरील घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत लोकल थांबवून ठेवण्यात आली. तिची यशस्वीरीत्या प्रसूती करण्यात आली. या महिलेला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. (प्रतिनधी)
लोकलमध्ये महिलेची प्रसूती
By admin | Published: March 03, 2017 2:22 AM