मुंबई : देशात कोरोना संक्रमणाची दुसरी लाट ओसरत असतानाच कोरोना विषाणूच्या डेल्टा प्लस व्हेरियंटने धुमाकूळ घातला आहे. विषाणूच्या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जावे लागू शकते. परंतु, कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण सुरू आहे. मास्क लावणे, दिवसातून अनेकवेळा २० सेकंद हात धुणे, अंतर राखणे, परिसर निर्जंतुकीकरण करणे; अशी काळजी प्रत्येकानी घ्यायला हवी. डेल्टा प्लस व्हेरियंट कोरोनाची तिसरी लाट ठरू नये, ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी असल्याचे मत इंटरनल मेडिसिन एक्स्पर्ट डॉ. तुषार राणे यांनी व्यक्त केले.
डेल्टा प्लस व्हेरियंट म्हणजे काय?डेल्टा हा कोरोना विषाणूचा जनुकीय बदल झाल्यामुळे तयार झालेला प्रकार आहे. या विषाणूमध्ये असे बदल नियमित होत असतात. त्याची संसर्गक्षमता आता अधिक वाढली आहे. डेल्टा प्लस हा व्हेरियंट अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे आजाराची लक्षणे चार ते पाच दिवसात दिसू लागतात. हा विषाणू फुफ्फुसाच्या पेशींच्या रिसेप्टरला अधिक घट्टपणे चिकटून राहतो. ज्यामुळे फुफ्फुसांना लवकर प्रभाव होण्याची शक्यता असते.
लस डेल्टा प्लस व्हेरियंटवर प्रभावी ठरेल?कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन डेल्टा व्हेरियंटचा शरिरावर होणारा प्रभाव रोखू शकतात. मात्र, या लसींमुळे शरिरात तयार होणाऱ्या अँटिबॉडीज टायटर्सचे प्रमाण किती आहे, हे सध्या तपासून पाहिले जात आहे. मात्र, लस घेतली तर विषाणूचा प्रादुर्भाव कमी होतो आणि प्रसारही रोखला जातो, हे आता सिद्ध झाले आहे. त्यामुळे अनेक लोक विषाणूच्या प्रादुर्भावापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी लसीकरण करून घेऊ लागले आहेत.
कुठे या आजाराचे रूग्ण आढळून आले आहेत का?डेल्टा प्लस व्हेरियंट भारतासह जगभरातील ८० देशांमध्ये आढळून आला आहे. अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया यांचा यात समावेश आहे. महाराष्ट्रात डेल्टाचा धोका दिवसेंदिवस वाढतो आहे. हा धोका वाढू नये, यासाठी नागरिकांनी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरेलेली नाही. मात्र, असे असतानाही लोक सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू लागले आहेत. केरळ, महाराष्ट्र, मध्य प्रदेश या राज्यांमध्ये या आजाराचे रूग्ण आढळले आहेत.
डेल्टा प्लस व्हेरियंटवर अँटिबॉडी काॅकटेल थेरपी फायदेशीर ठरेल?कोरोनाची सौम्य लक्षणे असलेल्या रूग्णांसाठी अँटिबॉडी कॉकटेल थेरपी उपचारांना भारतात मंजुरी देण्यात आली आहे. लक्षणे दिसून आल्यानंतर पुढील सात ते दहा दिवसांत ही थेरपी फायदेशीर ठरू शकते. कासिरिविमॅब आणि इम्डेविमॅब यासारख्या औषधांना मान्यता देण्यात आली आहे.\
अँण्टीबाँडी काँकटेल थेरपी म्हणजे काय ?मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेल ही थेरपी अनेक वर्षांपासून कर्करूग्णांवर उपचार करण्यासाठी वापरली जात आहे. या थेरपीमुळे अनेक रूग्णांमध्ये चांगले परिणाम दिसून आले आहे. मोनोक्लोनल अँटीबॉडी हे कोरोनाशी लढण्यासाठी प्लाझ्मामधून काढलेले आहे. रुग्णांना कासिरिविमॅब (६०० एमजी) आणि इम्डेविमॅब (६०० एमजी) या दोन्ही औषधांचे गुण असलेले औषध दिले जाते. हे औषध इंजेक्शनद्वारे दिले जाते. अँटीबॉडी कॉकटेलची संपूर्ण डोस ३० मिनिटांत दिली जाते. त्यानंतर एक तास रूग्णांना देखरेखीखाली ठेवण्यात येते.