मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार विधानसभेत अर्थसंकल्प मांडत असताना, त्या आधीच त्यांच्या ट्विटर अकाऊंटरवरून अर्थसंकल्पाचे मुद्दे शेयर करण्यात आले असून, अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्याचे पडसाद विधानसभेत आज सुद्धा पहायला मिळाले. फुटलेल्या अर्थसंकल्पाची सायबर क्राईमकडून चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या घोषणा देत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बुधवारी सकाळी निदर्शने केली
सुधीर मुनगंटीवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्प फोडला असल्याचा आरोप करत विरोधकांनी त्याच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यांनतर याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत, विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र फडणवीस यांचे मुद्दे पटले नसल्याने, त्याचे पडसाद आज (बुधवारी) पुन्हा उमटताना पहायला मिळाले.
सरकारने अर्थसंकल्प फोडले असून त्याची सायबर क्राईमकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या घोषणा देत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली.
विधानसभेत मंगळवारी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्प हे अनेक कारणांनी ऐतिहासिक ठरला आहे. पहिल्यांदाच अर्थसंकल्प फुटल्याचा आरोप करण्यात आला. तर दुसरीकडे इतिहासात पहिल्यांदाच विरोधी पक्षाच्या अनुपस्थित अर्थसंकल्प मांडला गेल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे विकासाच्या प्रश्नांना सोडून सत्ताधारी आणि विरोधकांचा एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी वेळ जात असल्याचे पहायला मिळत आहे.