मुंबई : ‘अॅग्नेस आॅफ गॉड’ या नाटकावर बंदी आणण्याची मागणी सरकारने फेटाळून लावली. मात्र नाटकाचे चित्रीकरण करून हरकत घेण्यायोग्य भाग आहे का ते पडताळून पाहावे, असा आदेश अल्पसंख्याक विकास खात्याचे मंत्री एकनाथ खडसे यांनी सोमवारी दिला.‘अॅग्नेस आॅफ गॉड’ या नाटकात ख्रिस्ती समाजाबद्दल विकृत चित्रण केले आहे. त्यामुळे या नाटकावर बंदी घालण्याची मागणी कॅथॉलिक सेक्युलर फोरमने सरकारकडे केली होती. यासंदर्भात कॅथॉलिक ख्रिश्चन फोरमचे जोसेफ डायस यांनी खडसे यांची भेट घेतली. मात्र नाटकाला सेन्सॉर बोर्डाचे प्रमाणपत्र मिळाले असल्याने त्यावर बंदी आणता येणार नाही, अशी भूमिका खडसे यांनी घेतली. मात्र त्याचवेळी या नाटकाबद्दल जर काही तक्रार असेल तर कॅथॉलिक सेक्युलर फोरमने सेन्सॉर बोर्डाकडे किंवा न्यायालयात धाव घ्यावी, असे मतही खडसे यांनी व्यक्त केले. नाटकात काही आक्षेपार्ह भाग आहे किंवा कसे ते तपासून पाहण्याकरिता त्याचे चित्रीकरण करण्यात येईल व काही आक्षेपार्ह आहे का ते तपासून पाहिले जाईल, असे ते म्हणाले. नाटकाचे दिग्दर्शक कैझाद कोतवाल यांनीही मंत्री खडसे यांची भेट घेऊन आपले म्हणणे सादर केले. (विशेष प्रतिनिधी)काय आहे नाटकात?‘अग्नेस आॅफ गॉड’ हे नाटक न्यू यॉर्कमधील एका सत्यघटनेवर आधारित आहे. नाटकातील नायिका नन असते आणि ती एका मुलाला जन्म देते. तिच्यावर खटला भरला जातो. पण आपण व्हर्जिन असल्याचा दावा ती न्यायालयात करते, असे या नाटकाचे कथासूत्र आहे.
‘अॅग्नेस...’बंदीची मागणी फेटाळली
By admin | Published: October 06, 2015 3:19 AM