ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. १७ - शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे प्रकाशन तीन दिवस थांबविण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. ' मात्र ही मागणी चुकीची असून पेपरवर बंदी घालू नये' असे सांगत केंद्रीय नगरविकास मंत्री वैकंय्या नायडू यांनी पक्षालाच घरचा आहेर दिला. ' सामना पेपरवर बंदी घालण्याची भाजपा कार्यकऱ्यांकडून करण्यात आलेली मागणी चुकीची असून पेपरवर बंदी घालू नये. त्यांना मोदींविरोधात जे लिहायचे ते लिहू द्यावे, अखेर जनता निर्णय घेईल' असे नायडू यांनी म्हटले.
राज्यात सुरु असलेल्या महापालिका व जिल्हा परिषदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामना पेपरवर ३ दिवस बंदी घालण्याची मागणी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाकडे करण्यात आली होती. यापार्श्वभूमीवर नायडू यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी त्यांची भूमिका मांडली. भाजप व शिवसेना राज्यात एकत्र सत्तेवर असताना महापालिका निवडणूक प्रचारामध्ये एकमेकांविरोधात अयोग्य भाषेत टीका करणेही चुकीचे असल्याचे नायडू यांनी यावेळी स्पष्ट केले.
भाजपाच्या प्रदेश प्रवक्त्या श्वेता शालिनी यांनी राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र देऊन १६ तसेच २० आणि २१ फेब्रुवारी रोजी सामना प्रकाशित करण्यास बंदी आणावी अशी मागणी केली होती. ‘सामना’मध्ये शिवसेनेचा राजकीय फायदा होईल असा मजकूर छापला जात आहे. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून त्या बद्दल शिवसेना, सामनाचे संपादक यांच्यावर कारवाई करावी, संपूर्ण निवडणूक प्रचारकाळात सामनामध्ये छापलेला प्रचारकी मजकूर हा जाहिरातीचा भाग असल्याने तो शिवसेनेने निवडणूक खर्चात जोडलेला आहे की नाही याची चौकशी करावी आणि जोडलेला नसेल तर तो पेड न्यूज समजण्यात यावा, अशा तीन मागण्या श्वेता शालिनी यांनी निवेदनात केल्या होत्या.
मात्र हा प्रकार म्हणजे माध्यमांवर बंधने घालून भाजपा लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न असल्याची टीका विरोधकांनी केली होती. ' : भाजपाकडून सरकारविरोधी बातम्या देणाऱ्या प्रसिद्धी माध्यमांचा गळा दाबण्याचे काम सुरू आहे. मध्यंतरी एका वाहिनीच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली होती. आता सामना पेपरवर बंदी घालण्याची मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे' अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपावर टीकास्त्र सोडले.