तळवडे : रुपीनगर येथील मुख्य रस्त्याच्या कडेने असलेल्या विद्युत वाहिन्यांच्या खांबांना ओढे तुटून गेल्याने आधार राहिला नसल्यामुळे ते सैल झाले आहेत. काही इमारतींच्या अगदी जवळून विद्युत वाहिन्या गेल्या आहेत. संभाव्य अपघात टाळण्यासाठी येथे केबल भूमिगत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.रुपीनगर येथील काही भागात विद्युत वाहिन्या भूमिगत केल्या आहेत. काही भागांत अद्यापही या तारा खांबांवरून गेलेल्या आहेत. एकेका खांबावर पंचवीसपेक्षा जास्त वीजजोड दिलेले असल्याने तारांचे जाळे निर्माण झाले आहे. काही भागांत या विद्युत वाहिन्या नागरिकांनी बांधलेल्या एक ते दोन मजली इमारतींच्या अगदी जवळून गेल्या आहेत. बऱ्याचदा तेथे लहान मुले खेळत असतात. खांबाचे ओढे तुटून गेले असल्याने खांब हलत असून, तारांनाही झोळ पडले आहेत. सैल झालेल्या तारा एकमेकांना घासून शॉर्टसर्किट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सैल झालेल्या तारांमुळे होणारे शॉर्टसर्किट टाळण्यासाठी काही भागातील तारांना लाकडी काठ्या बांधल्या आहेत. या समस्येतून कायमची सुटका करावी, अशी मागणी रहिवासी करत आहेत. (वार्ताहर)
केबल भूमिगत करण्याची मागणी
By admin | Published: April 29, 2016 2:08 AM