अमरावती/अकोला : मराठा-कुणबी हे एकच आहेत. त्यांच्यात कोणताही वाद नाही. बदलत्या काळानुसार मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे. एवढेच नव्हे तर छत्रपती शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी कुणबी समाजानेच दिली, असे ठाम मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी रविवारी व्यक्त केले. राज्य विधिमंडळाच्या दोन दिवसीय अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर चर्चा करा अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा आरक्षण जनसंवाद दौऱ्यानिमित्त संभाजीराजे रविवारी अकोला, अमरावती व बुलडाण्याच्या दौऱ्यावर होते. अमरावतीतील जनसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते म्हणाले, १९१७ साली खामगाव येथे छत्रपती शाहू महाराज परिषदेकरिता आले होते. त्यावेळी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही, हे त्यांनी निक्षून सांगितले होते.
या वेळी उपस्थित डॉ. पंजाबराव देशमुख यांनी परिषदेतून प्रेरणा घेतली आणि विदर्भात श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे जाळे विणले. मराठ्यांना शैक्षणिक, आर्थिक प्रगती करायची असेल, तर कुणबी व्हा, असे आवाहनदेखील भाऊसाहेबांनी केले होते. त्यांच्या हाकेला साद देणारे बहुतांश मराठे आज कुणबी झाले आहेत. जे वंचित राहिले, त्या मराठ्यांना परिस्थितीनुरूप आरक्षण देणे ही काळाची गरज असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. राजर्षी शाहू महाराजांनी १९०२ मध्ये बहुजन समाजाला आरक्षण दिले होते, याची आठवण त्यांनी करून दिली.
लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला पाहिजेमराठा आरक्षणासाठी समाजातील मंत्री, खासदार व आमदार इत्यादी लोकप्रतिनिधींनी आवाज उठविला पाहिजे, असे आवाहन करीत विधिमंडळाच्या अधिवेशनात मराठा आरक्षणावर चर्चा करा, अशी मागणी अकोला येथे त्यांनी केली. मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर मागासवर्गीय आयोग नेमणे हाच आता पर्याय असून, त्यासाठी भोसले समितीच्या सूचना राज्यपालांकडे सादर करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यानंतर यासंदर्भात राज्य सरकारने केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करावा आणि केंद्र सरकारने राष्ट्रपतींकडे प्रस्ताव सादर करुन वटहुकूम काढावा, असेही त्यांनी सांगितले. मराठा समाजाला तसेच इतर बहुजन समाजासाठी आरक्षण गरजेचे झाले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे ते देऊळगाव राजा येथे कार्यकर्त्यांना संबाधित करताना म्हणाले.