औरंगाबाद : राज्य तंत्रशिक्षण विभागातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी साडेतीन लाख विद्यार्थ्यांना २०१६-१७ शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्यात आले होते. त्यावेळी तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी सेलने प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचे डिमांड ड्राफ्ट (डीडी) घेतले. मात्र, ३७ हजार ५००हून अधिक विद्यार्थ्यांचे डीडी तीन महिन्यांत बँकेत जमा न केल्यामुळे ते ‘आऊटडेट’ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माण आणि पॉलिटेक्निक अभ्यासक्रमांसाठी सीईटी (सामायिक प्रवेश परीक्षा) घेऊन केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. २०१६-१७ या शैक्षणिक वर्षात तीन लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला होता. प्रवेश यादी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी प्रवेशफेरीच्या वेळी तंत्रशिक्षण विभागाच्या सीईटी सेलकडे प्रवेशासाठी ५ हजार रुपयांचा डीडी जमा करतात. तब्बल ३७ हजार ५००पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचे डीडी आऊटडेट झाल्यामुळे ते संबंधित महाविद्यालयांकडे परत पाठविण्यात आले आहेत.
राज्यात ३७,५०० विद्यार्थ्यांचे डिमांड ड्राफ्ट ‘आऊटडेट’
By admin | Published: April 22, 2017 4:01 AM