नाना पटोलेंच्या उचलबांगडीची मागणी, डॉ. आशिष देशमुखांचे काँग्रेस अध्यक्षांना पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 10:16 AM2023-01-18T10:16:43+5:302023-01-18T10:17:19+5:30
प्रदेशाध्यक्ष या नात्याने पटोले यांनी प्रश्न योग्यरीतीने हाताळले नसल्याचा आरोप
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या कार्यकाळात काँग्रेसची पीछेहाट व नाचक्की झाली असून, या नेतृत्वात बदल न केल्यास काँग्रेसला मोठी किंमत चुकवावी लागेल, अशी तक्रार काँग्रेसचे माजी आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे केली आहे.
देशमुख यांनी मंगळवारी काँग्रेसच्या मुख्यालयात खरगे यांची भेट घेतली व त्यांना पत्र दिले. त्यात त्यांनी पटोले यांच्यावर हल्लाबोल करीत त्यांच्या उचलबांगडीची मागणी केली आहे. काही महिन्यांमध्ये राज्यातील काँग्रेसची वाटचाल अधोगतीकडे होत आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघातील घोळामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यापूर्वी नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत वेळेवर रवींद्र भोयर यांची उमेदवारी मागे घेण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष या नात्याने पटोले यांनी हे प्रश्न योग्यरीतीने हाताळले नाही. यामुळे काँग्रेसच्या उमेदवाराचा घोळ झाला. महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. परंतु, गेल्या वर्षातील काँग्रेसची वाटचाल योग्यरीतीने सुरू नसल्याने पटोले यांच्याजागी काँग्रेस अध्यक्षाप्रमाणे निवडणूक व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.