Ajit Pawar ( Marathi News ) : पुणे अपघात प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांना लक्ष्य केलं जात आहे. अपघातानंतर अजित पवार यांनी आरोपीला वाचवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांना फोन केल्याचा संशय व्यक्त करत त्यांची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. दमानिया यांनी दिलेलं नार्को टेस्टचं आव्हान आता अजित पवारांनी स्वीकारलं आहे. मात्र हे आव्हान स्वीकारत असताना त्यांनी एक अटही ठेवली आहे.
नार्को टेस्टबाबतच्या मागणीवर बोलताना अजित पवार म्हणाले की, "नार्को टेस्टसाठी माझी तयारी आहे. मात्र या टेस्टमध्ये मी क्लिअर निघालो तर दमानिया यांनी पुन्हा कधी प्रसारमाध्यमांसमोर यायचं नाही. गप्प संन्यास घेऊन घरी बसायचं. त्यांची तशी तयारी आहे का?" असा सवाल अजित पवारांनी विचारला.
दरम्यान, अजित पवारांनी दिलेलं हे प्रतिआव्हान अंजली दमानिया यांनीही स्वीकारलं असून मी हे आव्हान स्वीकारला तयार आहे, फक्त नार्को टेस्टसाठी मी जे प्रश्न सांगेन ते विचारले गेले पाहिजेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
दमानिया विरुद्ध राष्ट्रवादी वाद पेटला!
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुणे अपघातावरून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी दमानिया यांच्यावर आक्रमक शब्दांत प्रहार केला. चव्हाण यांची ही टीका अंजली दमानिया यांच्या जिव्हारी लागली असून त्यांनी नुकताच याबाबत आपल्या सोशल मीडिया हँडलवरून संताप व्यक्त केला होता.
अंजली दमानिया यांनी एक्सवर अजित पवार यांना टॅग करत म्हटलं की, "आज मला प्रचंड राग आला आहे. तुमच्या पक्षातले सूरज चव्हाण इतक्या खालच्या पातळीचे स्टेटमेंट करतात? आज मला त्या सूरज चव्हाणने 'रीचार्जवर काम करणारी बाई'असं म्हटलं. मला असं बोलावं? मी काय आहे आणि किती सिद्धांतांवर जगते हे तुमच्यापेक्षा चांगले कोणालाच माहीत नसेल. ते तुम्ही त्यांना सांगा, मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल. सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबरोबर ही भाषा? का ? त्यांनी राजकारणाबद्दल बोलू नये म्हणून? सध्या मर्यादा न पळणाऱ्या असल्या लोकांना तुम्ही असे बोलण्याची मुभा देता? मला यावर तुमची ताबडतोब प्रतिक्रिया आणि त्यांचाकडून लिखित स्वरुपात माफी हवी आहे," अशी मागणी दमानिया यांनी केली आहे.