ऑनलाइन लोकमत -
बीड, दि. 05 - गहाण जमीन सोडवून देण्यासाठी सावकाराने शेतक-याकडे मुलीची आणि सुनेची मागणी केल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. शेतक-याने सावकाराविरोधात पोलिसात तक्रार केली असून पोलीस सध्या तपास करत आहेत. धारुर जिल्ह्यातील शेतकरी इंदर मुंडे यांनी आपण सावकाराचं कर्ज फेडलं असूनही त्याने ही धक्कादायक मागणी केल्याचा आरोप केला आहे.
'शेतक-याने केलेल्या आरोपांच्या आधारावर आम्ही चौकशीला सुरुवात केली आहे. सावकाराविरोधात योग्य ती कारवाई केली जाईल', अशी माहिती पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर यांनी दिली आहे. राज्य महिला आयोगाच्या विजया रहाटकर यांनीदेखील पोलिसांशी संपर्क साधून या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे.
'सावकाराने जमीन जप्त केल्याची तक्रार इंदर मुंडे यांनी एप्रिलमध्ये केली होती. रविवारी मुंडे यांनी सावकार भगवान बडे आपल्याकडे मुलीची आणि सुनेची मागणी करत असल्याचा मुद्दा मांडला', असं अनिल पारस्कर यांनी सांगितलं आहे.