पुणे : पासपोर्ट मिळण्यासाठी पूर्वी लागणारा ३ ते ४ महिन्यांचा कालावधी कमी होऊन १५ दिवसाच्या आत पासपोर्ट मिळू लागल्याने वर्षभरात तात्काळ पासपोर्टच्या मागणीमध्ये घट झाली आहे. गेल्या वर्षभरात पासपोर्ट कार्यालयाच्यावतीने २ लाख ८२ हजार ७२२ पासपोर्टचे वितरण करण्यात आले आहे.पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाच्या अंतर्गत पुणे, सोलापूर, कोल्हापूर, नगर, सातारा, सांगली हे जिल्हे येतात. गेल्या काही वर्षांपासून पासपोर्ट काढणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत आहे. पुणे कार्यालयाच्यावतीने २०१४ मध्ये २ लाख २० हजार ८८७ पासपोर्ट वितरीत करण्यात आले होते, त्यामध्ये २०१५ साली ६० हजारांनी वाढ झाली असून २०१५ मध्ये २ लाख ८२ हजार ७२२ पासपोर्टचे वितरण करण्यात आले आहे. पासपोर्ट वितरण करण्याच्या क्षमतेमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. पासपोर्टसाठी अर्ज केल्यानंतर पासपोर्ट मिळण्यास खूपच जास्त उशीर होत असल्याने तात्काळ पासपोर्ट मिळण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या खूप जास्त होती. गेल्या काही दिवसांमध्ये पासपोर्ट कार्यालयामध्ये झालेल्या सकारात्मक बदलानंतर १५ दिवसापर्यंत पासपोर्ट मिळू लागला आहे. त्यामुळे तात्काळ पासपोर्टच्या मागणीत यंदा घट झाल्याचे दिसून येत आहे. २०१४ साली २० हजार ९३६ तात्काळ पासपोर्टसाठी मागणी नोंदविण्यात आली. त्यामध्ये २०१५ साली घट झाली असून २० हजार ४०३ इतकीच तात्काळ पासपोर्टसाठी मागणी आली. वस्तुत: पासपोर्टच्या मागणीत वाढ होत असताना तात्काळ पासपोर्टची मागणीमध्ये घट झाली आहे.
तात्काळ पासपोर्टची मागणी घटली
By admin | Published: January 19, 2016 1:57 AM