संदीप प्रधान - मुंबई
पश्चिम महाराष्ट्रात 11, खान्देशात सहा तर मराठवाडय़ात चार जागा भाजपाला वाढवून हव्या आहेत. याखेरीज शिवसेना सातत्याने पराभूत झालेल्या 59 जागांपैकी 34 जागा भाजपाला देण्याचा आग्रह आहे.
प. महाराष्ट्रातील 58 जागांपैकी सध्या भाजपा 19 जागा लढते. येथील काही विधानसभा मतदारसंघांत आतार्पयत शिवसेनेला 1क् हजारांपेक्षा जास्त मते मिळालेली नाहीत. त्यामुळे तेथील स्थानिक कार्यकत्र्याना असे विधानसभा मतदारसंघ भाजपाला मिळावे, असे वाटते. त्याचबरोबर काँग्रेस अथवा राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेते व प्रबळ उमेदवार भाजपात येऊ इच्छित आहेत. मात्र त्यांना हवे असलेले मतदारसंघ शिवसेनेकडे असून त्यांना शिवसेनेत जाण्यात रस नाही. त्यामुळे प. महाराष्ट्रातील आणखी 11 मतदारसंघांवर भाजपाने दावा सांगितला आहे.
खान्देशातील आदिवासीबहुल विभागातील कळवण, दिंडोरी, इगतपुरी, नंदूरबार, शहादा, पाचोरा वगैरे भागातील भाजपाच्या कार्यकत्र्याचा सहा विधानसभा मतदारसंघ वाढवून घेण्याचा आग्रह आहे. खान्देशात सध्या भाजपा 18 जागा लढते. खान्देशातील काही मतदारसंघ गुजरात व मध्य प्रदेश या भाजपाशासीत राज्यांना जोडलेले असून तेथील वातावरण सध्या भाजपाला अनुकूल असल्याचे स्थानिकांचे मत आहे. आदिवासी भागात जनसंघाच्या कामामुळे अतिरिक्त मतदारसंघांवर दावा करण्यात आला आहे.
मराठवाडय़ातील 19 मतदारसंघ भाजपा लढते. आणखी चार जागांची भाजपाची मागणी आहे. तुळजापूरची जागा मागील वेळी भाजपाला दिली गेली. नांदेडमधील भास्करराव पाटील-खतगावकर, सूर्यकांता पाटील ही मंडळी भाजपात दाखल झाली आहेत. परभणी जिल्ह्यातील केवळ एक जागा सध्या भाजपाकडे आहे. त्यामुळे तेथील कार्यकत्र्याचा जागा वाढवून घेण्याचा आग्रह आहे.
शिवसेनेकडील ‘त्या’ 34 जागा भाजपाला हव्याच
शिवसेना सातत्याने पराभूत होत असलेल्या जागांची संख्या 59 आहे. त्यापैकी 34 मतदारसंघ शिवसेनेने भाजपाला द्यावे. भाजपा सातत्याने पराभूत होत असलेले 19 मतदारसंघ शिवसेनेने लढवावे. या अदलाबदलीत 44 मतदारसंघ शिवसेनेकडे राहतील, असा भाजपाचा प्रस्ताव आहे.