देहूरोड : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह बहुजन समाजातील इतर महापुरुषांबद्दल सोशल मीडियावर अपशब्द लिहिणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, तसेच चार दिवसांपूर्वी फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याबद्दल गुन्हा दाखल केलेल्या तिघांना तातडीने अटक करावी, अशी मागणी निषेध सभेत करण्यात आली. दरम्यान, या प्रकाराबाबत देहूरोड बाजारपेठेतून निषेध रॅली काढून तलाठी कार्यालयात निवेदन देण्यात आले. बौद्ध बांधवांनी केलेल्या आवाहनानुसार देहूरोड बाजारपेठ मंगळवारी बंद ठेवण्यात आली होती. या वेळी झालेल्या निषेध सभेत प्रा. दि. बा. बागुल, बाळासाहेब गायकवाड , धर्मपाल तंतरपाळे , अशोक गायकवाड , अमोल नाईकनवरे , सूर्यकांत सुर्वे , माउली सोनवणे, धर्मराज साळवे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी देहूरोड ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण मोरे यांनी संबंधितांना दोन दिवसांत अटक करण्यात येईल असे स्पष्ट केले . या वेळी राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे , मनसेचे देहूरोड शहराध्यक्ष विनोद भंडारी , भाजपाचे अमोल नाईकनवरे , सचिन शिंगाडे , पंचायत समितीचे माजी सदस्य राजू आगळे , समता सैनिक दलाचे संजय आगळे आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मंगळवारी सकाळी ११च्या सुमारास देहूरोड येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून निषेध रॅलीला सुरुवात झाली. त्यानंतर रॅली धम्मभूमीत आल्यानंतर धम्मवंदना घेण्यात आली. बाजारपेठेतून रॅली काढून तलाठी एम. ए. पवार यांना सविस्तर निवेदन देण्यात आले. रॅलीत व सभेला देहूरोड, किवळे, मावळ व हवेलीसह परिसरातील बौद्ध बांधव व बहुजन अनुयायी, तसेच विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (वार्ताहर)चार दिवसांपूर्वी अक्षय राक्षे याने फेसबुकवरील एका ग्रुपवर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले. त्यास विराज मराठे व विक्रांत भोसले यांनीही समनार्थ लिखाण करून प्रतिसाद दिला. या प्रकाराचा निषेध करण्यासाठी देहूरोड येथील ऐतिहासिक सुभाष चौकात निषेध सभा घेण्यात आली . तसेच संबंधित तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याने पोलिसांनी त्यांना अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.
आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्यांच्या अटकेची मागणी
By admin | Published: January 18, 2017 1:59 AM