ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 23 - महाराष्ट्राचे दिवंगत मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी लोकसभेत गुरुवारी करण्यात आली.
वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारने सन्मानित करण्यात यावे, अशी मागणी कॉंग्रेसचे खासदार राजीव सातव यांनी लोकसभेत शून्यकाळादरम्यान केली. वसंतराव नाईक यांनी 1963 ते 1975 च्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते. ते महान नेते होते. राज्यात रोजगार हमी योजना सुरू करण्याचा क्रांतिकारी निर्णय त्यांनी अमलात आणला होता. तसेच, देशात राबविण्यात येणा-या मनरेगा सारख्या महत्वपूर्ण योजना राबविण्यामागे त्यांची मोठी कामगिरी होती. त्यामुळे त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न या पुरस्काराने गौरविण्यात यावे आणि त्यांचा फोटो संसदेत लावण्यात यावा, अशी मागणी राजीव सातव यांनी यावेळी केली.
याआधीही वसंतराव नाईक यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी मागणी काही संघटनानी केली होती.
वसंतराव नाईक यांच्याविषयी माहिती...
हरित क्रांतीचे प्रणेते अशी वसंतराव नाईक यांची ओळख होती. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी सर्वाधिक काळ राज्यभार सांभाळला होता. सतत अकरा वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद भूषविले होते. त्यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसद या गावाजवळील महुली या छोट्याश्या खेड्यात झाला होता. सुरुवातील काळात त्यांनी सर्वात पहिले पुसद नगरपालिकेचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याचे प्रतिनिधी म्हणून मध्यप्रदेश विधानसभेवर निवडून आले तसेच मध्यप्रदेश मंत्रिमंडळात महसूल उपमंत्री झाले. सन 1951 साली ते मध्यप्रदेश सहकारी मध्यवर्ती बँकेचे संचालक होते. याचवर्षी विदर्भ प्रदेश समितीचे व कार्यकारिणीचे सदस्यपदी निवड झाली. सन 1956 साली भाषावार प्रांत रचना होईपर्यंत त्यांनी उपमंत्रीपदाची धुरा सांभाळली. त्यांनी महसूल खात्याची जबाबदारी अत्यंत हुशारीने पार पाडली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे भारताचे संरक्षणमंत्री झाले. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे सुत्रे दादासाहेब कन्नमवार यांच्या हाती आले. परंतु एक वर्षानंतर म्हणजे 1963 साली दादासाहेब कन्नमवार यांचे निधन झाल्यामुळे वसंतराव नाईक यांची बहुमताने मुख्यमंत्रीपदी निवड झाली होती. याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणूनही त्यांची ओळख होती.