मुंबई - ज्या मतदारांनी आम्हाल त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी विधानसभेत निवडून दिले आहे, त्या मतदारांचे प्रश्न आम्हाला निलंबित असल्याने हिवाळी अधिवेशनात मांडता येणार नाहीत. यामुळे मतदारांवर अन्याय होऊ नये, म्हणून आमच्यावर करण्यात आलेल्या निलंबनाच्या कारवाईच्या एक वर्षांच्या कालावधीचा फेर विचार करण्यात यावा, अशी विनंती करणारे 12 पत्र भाजपच्या 12 आमदारांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पाठविली आहेत. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजपच्या बारा आमदारांना 1 वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. भाजप आमदार आणि विधानसभा मुख्य प्रतोद अॅड. आशिष शेलार आणि 11 आमदार यांनी या निलंबनाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने दाखल करुन घेतली असून 11 जानेवारीला पुढील सुनावणी होणार आहे. त्यावेळी न्यायालयाने सराकर आणि विधिमंडळाला आपली बाजू मांडण्यास सांगितले आहे. दरम्यान, ही याचिका दाखल करुन घेताना न्यायालयाने या आमदारांचा आपल्या निलंबनाचा कालावधी कमी करण्यासाठी विधानसभा अध्यक्षांना विनंती करण्याचा अधिकार अबादीत ठेवला आहे. त्यानुसार आमदार आशिष शेलार यांच्यासह 12 आमदारांनी स्वत्रपणे पत्र लिहून विधानसभा उपाध्यक्षांना विनंती केली आहे.
निलंबन कालावधी कमी करण्याची मागणी, 12 आमदारांचं विधानसभा उपाध्यक्षांना विंनती पत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2021 9:16 PM