नवी मुंबई : सारसोळे गावामध्ये मार्केटसाठी आरक्षित ठेवलेल्या भूखंडावर अनधिकृत इमारत बांधण्यात आली आहे. स्थानिक रहिवाशांनी तक्रारी केल्यानंतर महापालिकेने कारवाई केल्याचे भासविले. पण प्रत्यक्षात पूर्ण इमारत न पाडता पथक माघारी फिरले. यामुळे कारवाईविषयी हेतूवरच शंका उपस्थित केली जात असून मार्केटचा भूखंड कधी मोकळा होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. नेरूळ सेक्टर ६ सारसोळे गाव येथील भूखंड क्रमांक ८ ए हा मार्केटसाठी राखून ठेवण्यात आला आहे. परंतु या भूखंडावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. २०१३ मध्ये हे बांधकाम सुरू करण्यात आले. गावातील स्थानिक नागरिकांनी याला विरोध केला होता. हा भूखंड मार्केटसाठी राखीव असल्याने त्यावर मार्केटच उभारण्यात यावे अशी मागणी केली होती. दोन मजली बांधकाम पूर्ण झाल्यानंतर सिडकोने आॅक्टोबर २०१३ या बांधकामाला नोटीस दिली होती. पण प्रत्यक्षात कारवाई केली नाही. चार मजली इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले तरी कारवाई केली नव्हती. अखेर स्थानिकांच्या वाढत्या विरोधामुळे १७ जानेवारीला महापालिका व सिडकोने या बांधकामावर कारवाई करण्यासाठी यंत्रसामग्री तैनात केली होती, पण प्रत्यक्षात इमारत न पाडताच पथक माघारी गेले. कारवाईसाठी गेलेले पथक माघारी का फिरले याविषयी उलट -सुलट चर्चा सुरू आहे. नागरिकांच्या सुविधांसाठी राखीव भूखंडावरील अतिक्रमण तत्काळ काढण्यात यावे. या भूखंडाला संरक्षण कुंपण घालावे, अशी मागणीही केली असून पालिका कारवाई करणार की बिल्डरला पाठीशी घालणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मार्केटच्या भूखंडावरील अतिक्रमण हटविण्याची मागणी
By admin | Published: February 28, 2017 2:38 AM