- यदु जोशी, मुंबईविधान परिषदेचे सदस्य असलेल्या कॅबिनेट मंत्र्यांना वगळा आणि विधानसभेच्या सदस्यांना त्या जागी संधी द्या, या मागणीवरून शिवसेनेत गुप्त खलबते सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. मुंबईतीलच शिवसेनेच्या एका आमदाराने त्यासाठी पुढाकार घेतल्याचे समजते. उद्योगमंत्री सुभाष देसाई, परिवहनमंत्री दिवाकर रावते, पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. सार्वजनिक उपक्रम मंत्री एकनाथ शिंदे हे एकमेव विधानसभेचे सदस्य आहेत. मुंबईतील एका आमदाराच्या पुढाकाराने सात-आठ शिवसेना आमदार एकत्रित भेटले. विधान परिषद सदस्य असलेल्या मंत्र्यांना घरी बसवून त्या जागी विधानसभेच्या सदस्यांना संधी देण्याची मागणी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे करावी काय, याबाबत त्यात विचार झाला. सर्व आमदारांनी ‘आपण उद्धवजींना भेटले पाहिजे’, अशी भावना व्यक्त केल्याचे कळते. देसाई, रावते, कदम व डॉ सावंत यांचा मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला किती फायदा झाला? आमदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन होते. मग या मंत्र्यांचे का नाही? असा सवाल करीत, शिवसेनेच्या या मंत्र्यांकडे आमदारांची कामे होत नाहीत, अशी नाराजीही व्यक्त करण्यात आली. शिवसेनेचे ज्येष्ठ मंत्री आणि आमदारांमध्ये समन्वय नाही. शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासंबंधीचे विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजूर झाले, तेव्हा सेनेचा एकही मंत्री हजर नव्हता आणि केवळ एका आमदाराने हजेरी लावली. समन्वयाअभावीच असे घडले. विधेयक कामकाजामध्ये होते. ज्येष्ठ मंत्र्यांनी स्वत: हजर राहून आमदारांनाही हजर राहायला सांगावयास हवे होते, अशी भावना एका आमदाराने लोकमतकडे व्यक्त केली. ज्येष्ठ मंत्र्यांना हटविण्यासाठी खलबते सुरू असल्याच्या वृत्ताला त्याने दुजोरा दिला. उपरोक्त मंत्र्याना हटविण्याच्या मागणीसाठी पुढाकार घेत असलेले मुंबईतील एक आमदार हे मातोश्रीच्या नजीकचे मानले जातात. ते स्वत:ही मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. आमदारांनी एकत्रितपणे उद्धव ठाकरेंची भेट घेऊन ‘मंत्री हटाव’ची मागणी करावी की वैयक्तिक भेटून मागणी रेटावी याबाबत अद्याप एकमत होऊ शकलेले नाही. एकत्र भेटल्यास आपण बंड केल्याचे चित्र समोर येईल. ते टाळण्यासाठी एकेकाने भेटावे, असाही विचार आहे. या मागणीवर उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देतात, हे महत्त्वाचे असेल. मागणी मान्य झाल्यास सेनेच्या काही राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपद मिळू शकते. त्यामुळे हे राज्यमंत्री आमदारांच्या संभाव्य मोहिमेला पाठिंबा देतील, असे दिसते.
‘त्या’ मंत्र्यांना हटविण्याच्या मागणीने खळबळ
By admin | Published: March 09, 2017 12:50 AM